१५ जुलैपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत रहावा यासाठी औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने औद्योगिक क्षेत्रासह २७ गावांमध्ये गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. मात्र ग्रामीण भागात याविषयी तीव्र नाराजी असून सर्वपक्षीय नगरसेवकांसह नागरिकांनी सलग दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्यास विरोध दर्शविला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने दर बुधवारी व शनिवारी पाणी पुरवठा बंद ठेवला आहे. तसेच औद्योगिक विकास महामंडळाने उद्योग, स्थानिक स्वराज्य संस्था, तसेच २७ गावांमध्ये दोन दिवस लागोपाठ पाणी पुरवठा बंद ठेवला आहे. शुक्रवारी या भागातील उद्योग बंद असतात म्हणून उद्योजकांच्या सोयीने गुरुवारी व शुक्रवारी पाणीपुरवठा बंद ठेवला आहे. मात्र २७ गावांत मोठय़ा प्रमाणात बैठी घरे असून लागोपाठ दोन दिवस पाणी बंद ठेवले तर घरात दोन दिवस पुरेल एवढे पाणी साठवायचे कुठे असा सवाल नागरिक करत आहेत.
औद्योगिक विकास महामंडळाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पाणीपुरवठा दोन वेगवेगळ्या दिवशी बंद ठेवल्यास जलवाहिन्या पुन्हा कार्यरत होण्यास वेळ लागतो. त्यामुळे लागोपाठ पाणी पुरवठा बंद ठेवणे योग्य आहे. परंतू जनतेमध्ये याविषयी असंतोष असल्याने त्यांची बाजू लक्षात घेऊन या योजनेचा फेरविचार करण्यात येणार आहे.