बेकायदेशीर गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना ठाण्याच्या गुन्हे शाखेने अटक करण्यात आली आहे. या आरोपींकडून ५ लाख २५ हजार ६०० रुपये किंमतीचा एकूण ४३ किलो गांजा हस्तगत करण्यात आला. सदर आरोपींना कळवा परिसरातील अमित गार्डन येथून अटक करण्यात आले. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात एन. डी. पी. एस. कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट १ ला मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवारी नकुलसिंग राजपूत (२३) आणि महेंद्र सिंग राजपूत (२६) या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून अटक करण्यात आली आहे. हे दोघे ही मूळचे सोलापूर येथील रहिवाशी आहेत. ते मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात गांजा विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

एका रिक्षातून  २ इसम चार बॅगेतून काही तरी घेवून जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. ज्यावेळी पोलिसांनी त्यांची चौकशी केली त्यांच्याकडे ४३ किलो वजनाचा ५ लाख २५ हजार ६०० रुपयांचा गांजा आढळून आला.  या प्रकरणी पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेतले असून या लोकांनी हा गांजा कुठून आणला होता आणि तो कोणाला विकण्यासाठी आले होते आणि यात इतर आणखी सहभागी असलेल्या व्यक्तींचा शोध देखील गुन्हे शाखा अन्वेषण विभागाचे पोलीस घेत आहेत.