तपासणी अहवालात आणखी दोन चाचण्या करण्याची सूचना; वाहतूक कोंडी कायमच

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त अद्याप मिळालेला नाही. पुलाच्या तपासणी अहवालात आणखी दोन चाचण्या करण्याचे सुचविण्यात आले असून या चाचण्या पार पडल्यानंतरच दुरुस्तीबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. दरम्यान, जुन्या पुलावरून केवळ हलकी वाहनेच सोडण्यात येत असल्याने या मार्गावर वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा दररोज सामना करावा लागत आहे. वाहतूक नियंत्रण करताना वाहतूक पोलिसांची मात्र आता दमछाक होऊ लागली आहे.

वसई खाडीवरील वर्सोवा येथील जुन्या खाडी पुलाच्या गर्डरला तडे गेल्याने त्याची दुरुस्ती करण्यात येणार आहे. सद्य:स्थितीत हा पूल अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला असून पुलावरून केवळ हलकी वाहनेच सोडण्यात येत आहेत. अवजड वाहने जुन्या पुलाशेजारी असलेल्या नव्या पुलावरून सोडण्यात येत असल्याने या मार्गावर मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यासाठी विलंब होत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पुलाला झालेल्या नुकसानीची तपासणी करणाऱ्या पथकाने आपला अहवाल राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुख्यालयात सादर केला आहे. या अहवालात आणखी दोन चाचण्या करण्याची आवश्यकता असल्याच्या सूचना करण्यात आल्या असल्याची माहिती प्रधिकरणाचे व्यवस्थापक दिनेश अगरवाल यांनी दिली. येत्या एक-दोन दिवसांत या चाचण्यादेखील करण्यात येऊन त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुलाच्या दुरुस्तीचा पुढील दिशा नक्की करण्यात येईल, असे अगरवाल यांनी सांगितले.

दुरुस्तीच्या कामाला मुहूर्त मिळत नसल्याने वाहनचालक मात्र कमालीचे त्रस्त झाले आहेत, शिवाय वाहतूक नियंत्रित करताना वाहतूक पोलिसांच्या देखील नाकी नऊ येऊ लागले आहेत. आधीच वाहतूक विभागाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत. अधिकारी व कर्मचारी यांची एकत्रित संख्या केवळ ७७ असून यातील चाळीस पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्सोवा पुलाच्या बंदोबस्तासाठी दिवसरात्र तैनात करण्यात आले आहेत. याचा थेट परिणाम शहरातील वाहतूक व्यवस्थेवर झोला आहे. वाहतूक पोलीसच नसल्याने सिग्नल यंत्रणेला न जुमानता वाहनचालक सुसाट वेगाने वाहने हाकताना दिसून येत आहेत.

दुसरीकडे पोलिसांनी मध्यंतरी सुरू केलेली हेल्मेट न घालणारे दुचाकीस्वार, मद्याच्या अमलाखाली व सिग्नल तोडून वाहने दामटणाऱ्या वाहनचालकांवरील मोहिमा कर्मचाऱ्यांअभावी पारच बारगळल्या आहेत. यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेचाही पार बोजवारा उडताना दिसत आहेच शिवाय शासनाच्या महसुलावरही परिणाम झाला आहे.

नव्या पुलाचे काम सुरू करण्याची मागणी

जुन्या खाडी पुलाला ४३ वर्षे होऊन गेली आहेत. दोन वर्षांपूर्वीदेखील पुलाच्या एका गर्डरला तडे गेले होते. त्याच वेळी खाडीवर आणखी एक पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु नव्या पुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. स्थानिक नगरसेविका दक्षता ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याप्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केली आहे. या महामार्गावरील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेऊन नव्या पुलाच्या कामालादेखील लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी ठाकूर यांनी केली आहे.