देशाचे खरे ‘रत्न’ कोण होते हे जगाला कळण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न मिळायलाच हवे. अशी आग्रही भूमिका शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मांडली. ठाण्यात सुरू असलेल्या २९ व्या अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचा समारोप समारंभ रविवारी पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

२९ वे अखिल भारतीय स्वा. सावरकर साहित्य संमेलन ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये २१ ते २३ एप्रिल दरम्यान आयोजित केले होते. या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक तथा शिक्षणमंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मिनाक्षी शिंदे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

जे काम अनेक जन्म घेऊन करता येत नाही ते एकच जन्म घेवून सावरकरांनी करून दाखवले. म्हणून आपल्या देशाची ओळख सावरकर आहे, सरकारही आपलेच आहे. तेव्हा, सर्वच मिळून सावरकर यांच्यासाठी मरणोत्तर पुरस्कारासाठी पाठपुरावा करू. केवळ भारतरत्न देणे म्हणजे ओळख वाढवणे नव्हे किंबहुना, देशाचे खरे रत्न कोण होते हे जगाला कळण्यासाठी सावरकरांना भारतरत्न मिळायलाच हवे. अशी आग्रही भूमिका ठाकरे यांनी मांडली. दरम्यान, संमेलनाच्या समारोपप्रसंगी बोलताना शिक्षणमंत्री तावडे यांनी, ज्यांना सावरकर कळले नाही त्यांचे खूप नुकसान झाले. असा टोला काँग्रेसला लगावत सरकारच्या माध्यमातून आता आम्ही सावरकर सर्वत्र पोहचवू असे जाहीर आश्वासन दिले.