उल्हासनगरमधील कारवाईत सहा बांधकामे जमीनदोस्त

गेल्या काही दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या बेकायदा बांधकामाबाबत नागरिकांकडून टीका झाल्यानंतर अखेर आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी थेट रस्त्यावर उतरत बेकायदा बांधकामावर कारवाई केली. या वेळी विविध ठिकाणीची सहा बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र प्रभाग अधिकारी असताना आयुक्तांना रस्त्यावर उतरून कारवाई करण्याची नामुष्की ओढावल्याने प्रभाग अधिकाऱ्यांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते आहे.

उल्हासनगर शहरात जोमाने वाढणाऱ्या बेकायदा बांधकामांवर कारवाईसाठी पालिका प्रशासन प्रयत्नशील असते. मात्र सुट्टीच्या दिवशी किंवा पालिका प्रशासन एखाद्या कार्यक्रमात व्यस्त असताना अवघ्या काही तासांत बेकायदा बांधकामे उभे राहत असतात. या बांधकामांना स्थानिक प्रभाग अधिकाऱ्यांचेही अभय असल्याची चर्चा अनेकदा सर्रासपणे रंगते. मात्र त्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात पालिका प्रशासन कुचराई करत असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांत होत होता. त्यात विविध विषयांवर थेट भूमिका घेणारे आयुक्त राजेंद्र निंबाळकर बेकायदा बांधकामाबाबत अनभिज्ञ आहेत का, असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात होते. त्यावर बुधवारी आयुक्तांनी उत्तर देत थेट रस्त्यावर उतरत बेकायदा बांधकामावर कारवाई केली. शहरातील २४ बांधकामांची पाहणी करत त्यांना थांबवण्याचे आदेश दिले, तर सहा बांधकामे तात्काळ जमीनदोस्त करण्यात आली. यात शांतीनगर, कल्याण बदलापूर महामार्ग, संभाजी चौक परिसर, उड्डाणपुलाशेजारी सुरू असलेले बांधकाम, दसरा मैदानाशेजारील अनधिकृत दुकान, राधाबाई चौकातील बांधकाम अशा बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शहरातील बेकायदा बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. मात्र शहरात प्रभाग अधिकारी असताना त्यांच्या डोळ्यादेखत ही बांधकामे उभे राहत असताना ते अधिकारी काय करत असतात, असाही सवाल आता उपस्थित होतो आहे. त्यामुळे आयुक्तांना रस्त्यावर उतरून कारवाई करावी लागण्याची नामुष्की ओढावणे हे स्थानिक अधिकाऱ्यांचे अपयश असल्याचीच चर्चा शहरात रंगली होती.

बदनामी करण्यासाठी आरोप

गेल्या काही दिवसांत नगरसेवक शंकर लुंड यांनी शौचालयाच्या जागेवर बेकायदा बांधकाम केल्याची चर्चा शहरात होती. मात्र पालिकेने चौकशी करून कारवाई करावी, असे खुले आवाहन करत शंकर लुंड यांनी आरोप फेटाळून लावले. पालिका प्रशासनाने घरदुरुस्तीसाठी परवानगी नाकारल्यानेच बेकायदा बांधकामे होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे येत्या महासभेत दुरुस्ती परवानगीचा विषय घेतला जाणार असून तसे पत्रही आयुक्तांना दिले असल्याचेही शंकर लुंड यांनी सांगितले.