जागा सोडून मुख्यालयात फिरणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचे पालिका उपायुक्तांचे आदेश

पालिका मुख्यालयात अनेक कामे घेऊन नागरिक येत असतात. मात्र अनेकदा अधिकारी हजेरीपटावर उपस्थित असला तरी प्रत्यक्ष जागेवर अनुपस्थित असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे अनेकांना तासन्तास ताटकळत थांबावे लागते. आता अशा ऑन डय़ुटी अनुपस्थित राहणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर वेतनकपातीच्या कारवाईचा बडगा उचलला जाणार आहे. कामाशिवाय फिरणाऱ्या अशाच काही कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे आदेश मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिल्याने कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

सरकारी काम आणि सहा महिने थांब, ही म्हण डिजिटल काळातही अनेक सरकारी कार्यालयांत अनुभवास मिळते. सरकारी कर्मचारी हजेरीपटावर उपस्थित असतानाही विविध कारणांमुळे ते त्यांच्या कार्यालयात वा जागेवर सापडत नाही. त्यामुळे नागरिकांना मात्र तासनतास ताटकळत थांबावे लागते. उल्हासनगर महापालिकेतही अनेक वेळा अशा परिस्थितीला नागरिकांना सामोरे जावे लागले आहे. याच प्रश्नावर नागरिकांना समाधान देण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा कमी करण्यासाठी उल्हासनगर महापालिकेने शक्कल लढवली आहे.

नुकताच उल्हासनगर महापालिकेच्या मुख्यालय उपायुक्तपदाचा कार्यभार जमीर लेंगरेकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. कारभार हाती आल्यानंतर मुख्यालयातील कामाचा आढावा घेण्यासाठी लेंगरेकरांनी मुख्यालयाचा फेरफटका मारला.

यावेळी विविध विभागातील अनेक कर्मचारी आपल्या जागेवर नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यात वरिष्ठ लिपिक दत्तात्रय जाधव, अलका पवार, संगणक चालक सतीश राठोड, सात ते आठ लिपिक आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कामाच्या वेळी आपल्या जागेवर उपस्थित नसल्याने मुख्यालय उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना आपले एक दिवसाचे वेतन का कापू नये, अशा आशयाची कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे याप्रश्नावर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास या सर्व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

या कारवाईमुळे पालिकेतील अनेक कामचुकार आणि जागेवर न थांबणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले असून नोटीस बजावल्यापासून अनेक कर्मचारी आपल्या ठिकाणीच राहत असल्याचे दिसून येते आहे.

तत्कालीन आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कारभार हाती घेताच प्रत्येक खात्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. त्यामुळे प्रत्येक कार्यालयातील हालचाली आयुक्तांना पाहता येत होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये शिस्त लागली होती; मात्र बदलीने पुन्हा एकदा कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याच्या तक्रारी येत आहेत.