अनधिकृत बांधकामांवरील पालिकेच्या कारवाईला वेग

ठाणे शहरातील लेडीज बार तसेच लॉजची बांधकामे पाडण्याची कारवाई सलग तिसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारीही दिवसभर मोठय़ा धडाक्यात सुरू होती. या कारवाईमध्ये उपवनमधील सत्यम लॉजच्या बांधकामासोबतच नऊ लेडीज डान्स बार तसेच पाच लॉजचे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या कारवाईपूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल हे स्वत: शहरातील लेडीज बार आणि लॉजची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश देत होते. या कारवाईमुळे शहरातील बार तसेच लॉजमालकांचे धाबे दणाणले आहे.

उपवन तलाव परिसरातील सत्यम लॉजचे बांधकाम गुरुवारी उद्ध्वस्त केल्यानंतर शुक्रवारच्या कारवाईत शहराची चौपाटी आणि सौंदर्य असलेल्या तलावपाळी परिसरातील आम्रपाली या लेडीज बारवर महापालिकेने कारवाई केली. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या तलावपाळी परिसराची अनैतिक व्यवसायातून सुटका झाली आहे. सलग तिसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळपासून महापालिकेची दहा पथके शहरातील विविध बार तसेच लॉजवर कारवाई करण्यासाठी सज्ज झाली. आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाईपूर्वी अनेक लेडीज बार तसेच लॉजच्या बांधकामांची पाहणी करून त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश महापालिकेच्या पथकाला दिले. त्यानुसार, महापालिकेच्या पथकाकडून लेडीज बार व लॉजचे बांधकाम पाडण्याची कारवाई सुरू होती. त्यामध्ये नऊ लेडीज डान्स बार आणि पाच लॉजवर कारवाई करण्यात आली. माजिवाडा येथील मधुबन, नौपाडय़ातील अँटिक पॅलेस, आम्रपाली, के.व्हिला येथील आयना, खोपट येथील सोनिया, कोपरी येथील झुलेलाल, सिल्व्हर स्पॉट, गौरव, रिगल या लेडीज डान्स बारचे, तर माजिवडा येथील रेनबो, निसर्ग, चक्रा, सुरक्षा हे सर्व तळ अधिक तीन मजल्यांचे लॉज तोडून टाकण्यात आले.

‘सत्यम’प्रकरणी अद्याप गुन्हा नाही..

सत्यम लॉजवर महापालिकेचे पथक गुरुवारी कारवाई करण्यासाठी गेले होते. या कारवाईदरम्यान लॉजमध्ये २९० खोल्या आढळून आल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र या लॉजमध्ये केवळ ५१ खोल्या असल्याचा दावा वर्तकनगर पोलिसांनी केला आहे. असे असले तरी बेकायदा बांधकामामध्ये अनैतिक धंदे सुरू असल्याचे पालिकेच्या कारवाईतून उघड होऊनही सत्यम लॉजप्रकरणी अद्याप वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊ शकलेला नाही.