स्थानक परिसरात रेल्वे आणि महापालिका यांच्यात असलेला हद्दीचा वाद फेरीवाल्यांच्या पथ्यावर पडल्याचे ठाणे आणि कल्याणमध्ये दिसून येत आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात सकाळी फेरीवाले पहायला मिळत होते. मात्र, आता येथील फेरीवाले गायब झाले आहेत. एरवी या भागात सकाळी चक्क कांदेपोहे, चहा, गुटखा, सिगारेट विक्रीच्या टपऱ्या लागत होत्या. मात्र, गेल्या आठवडाभरापासून रेल्वे स्थानक आणि परिसरात एकही फेरीवाला दिसत नाही. असे असले तरी, रेल्वे स्थानकापासून काही अंतरावरील फेरीवाले मात्र हटायला तयार नाहीत. रात्रीच्या वेळी काही फळविक्रेते थेट पदपथाच्या बाजूला रस्त्यावर फळे विकत आहेत. या पथेरी मांडून बसणाऱ्या फळविक्रेत्यांकडून अनेकजण ही फळे विकत घेत असल्याने त्याचा फटका रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून घरी परतणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागतो. चालण्यासाठीही जागा उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम प्रवाशांवर होतो. त्यामुळे इथे कोंडी होते. तो भाग पालिकेच्या हद्दीत येतो. त्यामुळे कारवाई करता येत नाही. असे रेल्वेकडून सांगण्यात येते.

डोंबिवलीत पाठशिवणीचा खेळ..

डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान आणि पालिकेची पथके तैनात करण्यात आली आहेत. डोंबिवली पूर्व भागातील स्कायवॉकवरील फेरीवाल्यांना हटवून मार्गिका पादचाऱ्यांना खुली करण्यात आली. डोंबिवली पश्चिमेत ‘ह’ प्रभागातील फेरीवाला हटाव पथकाची दिवसभर गस्त असते.  गेल्या २० वर्षांपासून पूर्वेत ५० ते १०० फेरीवाले आपला गोतावळा घेऊन पूर्व भागात व्यवसाय करीत आहेत. ग्राहकही त्यांच्याकडून खरेदी करात. त्यामुळे गुन्हा दाखल झाला तर, बघू पण रोजची कमाई का सोडू या विचारातून फेरीवाले रेल्वे स्थानक परिसर सोडण्यास तयार नाहीत. पालिकेचे पथक आले की तेवढय़ा पुरते फेरीवाले इमारती, गल्लीबोळात लपतात.

कल्याण

कल्याण रेल्वे स्थानकात पालिकेच्या हद्दीतील पादचारी पुलावर अजूनही फेरीवाल्यांचे बस्तान हटलेले नाही. अनेकदा प्रवासी आणि फेरीवाल्यांमध्ये वाद झाल्यास फेरीवाले एकत्र येऊन प्रवाशांवर दादागिरी करतात. यापूर्वी रेल्वेच्या पादचारी पुलांवरही त्यांनी आपले बस्तान मांडले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी पुलावरून ये-जा करत असल्याने या पुलावरील फेरीवाल्यांच्या जाचापासून सुटका झाली आहे.