उत्तम आरोग्यासाठी फळे खाणे किंवा फळांचा रस प्राशन करणे आवश्यक असते. फळांच्या रसांमधून अनेक पोषक घटक शरीराला मिळतात, त्याशिवाय शरीर थंड ठेवण्यासाठीही फळांच्या रसाचा उपयोग होतो. वसईतील ‘अर्बन ज्यूस कॅफे’ म्हणजे ताज्या फळांचा रस मिळण्याचे उत्तम ठिकाण.

वसईत राहणाऱ्या ग्लेन डिकुन्हा आणि नंदन खानोलकर या मित्रांनी मिळून वसई आणि विरार येथे ‘अर्बन ज्यूस कॅफे’ तीन वर्षांपूर्वी सुरू केले. येथे केवळ ताज्या फळांचा रस मिळेल यास त्यांनी महत्त्व दिले. या कॅफेत ३८ प्रकारचे वेगवेगळे ज्यूस आणि १९ प्रकारचे मिल्कशेक मिळतात. ज्यूसमध्ये त्या त्या फळाचे कापदेखील मिसळले जातात, त्यामुळे ज्यूस पिण्यात एक वेगळाच आनंद येतो. प्रत्येक ज्यूस तयार करण्याआधी त्या फळाचा हंगाम, चव, रंग आणि आरोग्यदायी घटक यांचा विचार ते करतात. आपले शरीर आरोग्यदायी राहण्यासाठी या ठिकाणी ‘वेट मॅनेजमेंट’ नावाचा ज्यूस उपलब्ध असून तो डाळिंब, बीट आणि ग्रीन टी यांच्या मिश्रणातून तयार केला जातो. डाळिंब आणि इम्पोर्टेड बेरी यांच्यापासून बनवला गेलेला ‘पोमो बेरीज ज्यूस’ तर येथील खासियत आहे. पाईन किवी ज्यूस, कॉकटेल, स्वीट लाइफ, फिटनेस फर्स्ट, फील द बिट, किवी, कलिंगड, ब्लॅक ग्रेप्स, फॅट बर्नर हे सर्वच ज्यूस अप्रतिम असून खवय्यांची रसना तृप्त करतात.

या कॅफेमध्ये मिल्कशेकही उत्तम आहेत. मिल्कशेक तयार करताना कोणत्याही प्रकारचे सिरप वापरले जात नाहीत, तर खरीखुरी फळे वापरली जातात. ‘अ‍ॅपल बटर स्कॉच शेक’, ‘किट कॅट मॅडनेस ओरिओ कुल्फी शेक’, ‘किवी पॅशन’, ‘पिंक अ‍ॅपल’, ‘मिनी मँगो’, यांसारखे आणखी १९ प्रकारचे शेक येथे उपलब्ध आहेत. ज्यूस आणि शेकशिवाय येथे सँडविचदेखील मिळतात. त्यातला ‘अमेरिकन बार्बीक्यू सॅन्डविच’ हा येथील प्रसिद्ध आहे. पालक, ब्रोकोली, बेबी कॉर्न, स्वीट कॉर्न आणि मुख्य अमेरिकन बार्बीक्यू सॉस यापासून हे सॅन्डविच बनवले जाते. हा सॉस कॅफेमध्येच बनवला जातो, त्यामुळे त्याला वेगळीच चव येते. ‘स्मोकी मेक्सिकन सॉस’ हे सॅन्डविच येथे खूप प्रसिद्ध आहे. त्यात सर्व भाज्या तंदूरमध्ये रोस्ट केल्या जातात, त्यामुळे त्याला स्मोकी फ्लेवर येतो. या सँडविचला येथे विशेष मागणी असते. याव्यतिरिक्त तंदुरी पनीर, इटॅलियन पेस्टो, बोम्बे मसाला मिक्स, व्हेज चीज ग्रिल, चीज चिली यांसह सॅन्डविचदेखील उपलब्ध आहेत.

फ्रुट फालुदा हा आणखी एक भन्नाट प्रकार येथे चाखायला मिळेल. शेव सब्जा, ताजी फळे, आईस्क्रीम, रबडी यांसारख्या मिश्रणातून हा फालुदा तयार केला जातो. मुख्य म्हणजे या कॅफेत वापरला जाणारा ब्रेड हा कॅफेमध्येच बनवला जातो. मल्टिग्रेन असा हा ब्रेड असून तो बनवण्यासाठी त्यात अळशी, नाचणी, गहू, तीळ या सर्व गोष्टी मिसळल्या जातात. सर्व सॉस हे कॅफेमध्येच बनवले जातात. फळे नवी मुंबईच्या वाशी बाजारातून मागवली जातात. ग्राहकांच्या आरोग्याचा आणि त्यांच्या आवडीचा विचार करून येथे ज्यूस बनवले जातात.

अर्बन ज्यूस कॅफे

  • वसई : चिमाजी अप्पा मैदानाजवळ, वसई पश्चिम
  • विरार : जुन्या विवा महाविद्यालयाजवळ, विरार पश्चिम
  • वेळ : सकाळी १० ते रात्री १०