प्रेमीयुगुलांचाही पर्यटकांना त्रास; गैरप्रकार दूर करण्याची दुर्गप्रेमींची मागणी

बेभान झालेले मद्यपी, चित्रविचित्र कपडय़ांत फिरणारे प्रेमीयुगुल, शॉर्टफिल्मच्या निमित्ताने अश्लील नृत्य, गर्द झाडीत लपलेले गर्दुल्ले.. हे भीषण चित्र आहे वसईच्या किल्ल्याच्या. ज्या किल्ल्याला मराठय़ांच्या इतिहासात मानाचे स्थान आहे, तोच किल्ला आता मद्यपी आणि प्रेमीयुगुलांचा अड्डा बनला आहे. त्यामुळे या किल्ल्याच्या गौरवशाली इतिहासाचा अवमान होत आहेच, त्याशिवाय अभ्यास व संशोधनासाठी येणाऱ्या गिरिप्रेमी व दुर्गमित्रांची संख्याही मोठय़ा प्रमाणावर कमी होत आहे.

वसईच्या किल्ल्यात दर रविवारी आणि सुटीच्या दिवशी मद्यपींचा धिंगाणा असतो. भरदुपारी आणि संध्याकाळी येथे मद्याच्या पाटर्य़ा होतात आणि पार्टीनंतर मद्यपींकडून अन्य पर्यटकांना त्रास देणे सुरू होते. मद्याच्या बाटल्या आणि प्लॅस्टिकच्या पिशव्या यांचा तर खच पडतो. त्यामुळे सुटीच्या दिवशी तर प्रचंड कचरा किल्ल्यावर होतो आणि त्यामुळे किल्ल्याची शान कमी होत आहे. प्रेमीयुगुलांचे तर बिनधास्तपणे अश्लील चाळे करताना येथे आढळतात आणि त्यावर कुणाचेही नियंत्रण नाही.

किल्ल्यावरील झाडाझुडपांमध्ये गर्दुल्ले बिनधास्तपणे अमली पदार्थाचे सेवन करीत असतात. या गर्दुल्ल्यांकडून झाडाझुडपांना आगी लावण्याच्या घटनाही घडल्या आहेत.

किल्ल्यातील ताडीमाडी उद्योगाचा विकास व मद्यपींची सोय अशा भयानक वास्तव्यात किल्ला सापडलेला असून ज्या स्वराज्याच्या रक्षणासाठी व गडकोटांच्या स्वातंत्र्यासाठी नरवीरांनी सर्वस्वाचे बलिदान दिले, त्या गडकोटांवर मद्यपी व प्रेमीयुगुले यांचा नंगानाच सुरू आहे आणि याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप दुर्गप्रेमींनी केला आहे.

कारवाईची मागणी

किल्ल्यातील पोर्तुगीजकालीन कोर्ट, पोर्तुगीजकालीन नगरपालिका, चक्री जिना परिसर, सेंट गोन्सालो गार्सिया चर्च, मुख्य ध्वजस्तंभ या वास्तूंवर असणारा दारूबाजांचा धिंगाणा आणि प्रेमीयुगुलांचे चाळे यावर योग्य वेळी योग्य पावले न उचलल्यास किल्ला केवळ अनैतिक कामासाठीच प्रसिद्ध पावेल, असेही राऊत म्हणाले. किल्ल्यातील छायाचित्रणावर पुरातत्त्व विभागाची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक असून याबाबत पुरातत्त्व विभागाने जागोजागी माहितीफलक लावण्याची मागणी तसेच किल्ल्यातील सर्वच सुरक्षारक्षकांना योग्य ते ओळखपत्र देऊन किल्ल्यातील गैरप्रकारांवर आळा घालावा आणि स्थानिक पोलिसांनी किल्ल्यातील या मनमानीवर व स्वैराचारावर कठोर उपाययोजना करून किल्ल्याचे पावित्र्य राखण्यास मदत करावी, अशी मागणी ‘किल्ले वसई मोहीम’ने केली आहे.

सध्या काही महिन्यांपासून किल्ल्यातील वास्तूंच्या संरक्षणासाठी काही रक्षक तैनात करण्यात आलेले आहे. पण ते पूर्णत: हतबल व असहाय असल्याचे दिसत आहे. किल्ल्यातील गोन्सालो गार्सिया ख्रिस्त मंदिराचे आवार आणि मैदान मद्यपींच्या बैठकींनी बंदिस्त झालेले आहे. या उपाययोजना करण्याचे शासकीय व स्थानिक प्रयत्नही पूर्णत: शून्य स्वरूपाचे दिसत आहे.

– डॉ. श्रीदत्त राऊत, किल्ले वसई मोहीम