यकृत, मूत्रपिंडांचे वेगवेगळ्या रुग्णांवर प्रत्यारोपण

‘मरावे परि अवयवरूपी उरावे’ हे वाक्य वसईतील संगीतकार गोपालन यांनी सार्थ ठरवले आहे. संगिताला वाहून घेतलेल्या गोपालन यांनी आयुष्यभर रसिकांना सूरांचे दान दिले, मात्र मेंदूमृत (ब्रेन डेड) झाल्यानंतरही अवयवदान केले. त्यांचे यकृत आणि मूत्रपिंडांचे दोन वेगवेगळय़ा रुग्णांवर प्रत्यारोपण करण्यात आले. अवयवदानाने दोन रुग्णांना जीवनदान मिळाले.

वसई येथे राहणारे गोपालन ( ७८) हे सकाळी फेरफटका करत असताना वेगाने आलेल्या सायकलने त्यांना धडक दिली. या धडकेत ते रस्त्यावर आपटले आणि त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यांना वसईतील स्थानिक रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले होते. तेथील डॉक्टरांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले आणि पुढील उपचारासाठी मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयामध्ये भरती केले. वैद्यकीय उपचारांना प्रतिसाद देत नसल्यामुळे डॉक्टरांनी गोपालन यांच्या मेंदूचे कार्य  थांबले असल्याचे घोषित केले.

त्यानंतर गोपालन यांच्या कुटुंबीयांनी गोपालन यांचे अवयवदान करण्याची तयारी १४ सप्टेंबर रोजी दर्शविली. १५ सप्टेंबर रोजी मीरा रोड येथील वोक्हार्ट रुग्णालयामध्ये मूत्रपिंड व यकृत दोन वेगवेगळ्या रुग्णांमध्ये प्रत्यारोपण करण्यात आले. ब्रेन डेडच्या रुग्णांमध्ये दोन्ही मूत्रपिंड दोन वेगवेगळय़ा रुग्णांना देऊन त्यांचे प्राण वाचवता येतात, परंतु गोपालन यांचे वय पाहता त्यांची त्यांच्या दोन्ही मूत्रपिंड या एकाच व्यक्तीला देण्यात आल्या. असल्याचे वोक्हार्ट  रुग्णालयाचे किडनी प्रत्यारोपण शल्य चिकित्सक डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले.

गोपालन यांचे मूत्रपिंड मालाड येथे राहणाऱ्या ५० वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण केले आहे. गेली तीन वर्षे हा रुग्ण डायलासिसवर होता, परंतु आता त्यांची प्रकृती उत्तम आहे. गोपालन यांचे यकृत मुंबईतील एका ५६ वर्षीय रुग्णावर प्रत्यारोपण केले असून त्यांची प्रकृतीतही सुधारणा होत आहे.

– डॉ. अनुराग श्रीमल, यकृत प्रत्यारोपण शल्यचिकित्सक

सध्या अवयवदात्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येत आहे. कुटुंबीयांची संमती अशा परिस्थितीत खूप महत्त्वाची असते, त्यामुळे अवयवदानाच्या जनजागृतीमुळे आणखी जीव आपल्याला वाचवता येतील. गोपालन यांच्या मुलाने व नातेवाईकांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दोघांना जीवनदान मिळाले आहे.

– रवी हिरवाणी, केंद्रप्रमुख, वोक्हार्ट रुग्णालय