१० लाखांचे बिल थकविल्याने वीजपुरवठा खंडित; महावितरणकडे १० दिवसांच्या मुदतीची मागणी
सर्वसामान्य माणसाचे दोन महिन्यांचे वीज बिल थकल्यास त्यांचा वीजपुरवठा खंडित केला जातो. सर्वसामान्य माणसाची ही नामुष्की वसईच्या तहसीलदार कार्यालयावरही ओढावली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तहसीलदार कार्यालयाने वीज बिलच भरलेले नाही. तब्बल १० लाख रुपयांची थकबाकी झाल्याने महावितरणने या कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित केला आहे. बुधवारी वीजपुरवठा कापल्यानंतर घाईघाईने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने ७० हजार रुपयांचा भरणा महावितरणकडे करून दहा दिवसांची मुदत मागितली आहे. त्यामुळे पुन्हा हा वीजपुरवठा सुरू केला जाणार आहे.
वसईतील तहसील कार्यालयात एकूण तीन मीर असून एक महा ‘ई’ सेवा केंद्राच्या नावाने तर दोन मीर तहसीलदारांच्या नावाने आहे. परंतु तहसील कार्यालयाकडून वीज बिलाच्या रकमेचा भरणा केला जात नव्हता. गेल्या दोन वर्षांपासून वीज बिले थकली होती. वीज बिल थकविणाऱ्या सरकारी आस्थापनांना महावितरणने नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली होती. त्याप्रमाणे वसई तहसील कार्यालयालाही नोटीस पाठविण्यात आली. परंतु तहसीलदारांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार सुनील कोळी यांची भेट घेऊन वीज बिलाच्या रकमेचा भरणा करण्याची विनंती केली होती, तरीही त्यांनी दाद दिली नव्हती. त्यामुळे बुधवारी संध्याकाळी महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी तहसीलदार कार्यालयाची मीरजोडणी कापून वीजपुरवठा बंद केला. यामुळे वसई तहसीलदारांवर मोठी नामुष्की ओढवली. गुरुवारी घाईघाईने जिल्हाधिकारी कार्यालयाने थकीत बिलाच्या रकमेपैकी ७० हजार रुपये वितरणाकडे भरले आणि उर्वरित रक्कम भरण्यासाठी दहा दिवसांची मुदत मागितली. त्यामुळे हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे.
वीज बिल भरण्याविषयी तहसील कार्यालयाला वारंवार नोटिसा पाठवत होतो. प्रत्यक्ष भेट देऊनही कल्पना दिली होती. परंतु त्यांनी वीज बिलाची रक्कम भरली नाही. त्यामुळे आम्हाला ही कारवाई करावी लागली.
– विनायक इदाते,
अतिरिक्त अभियंता महावितरण