महापालिका आयुक्तांची हतबलता
वसईच्या संस्कृतीचा भाग असलेले बावखळ (छोटय़ा नैसर्गिक विहिरी) वाचविणे आणि त्याचे संवर्धन करण्यासाठी पालिकेकडे निधीच उपलब्ध नाही. वसईत आयोजित ‘बावखळे संवर्धन आणि बावखळे जोडणी’ या कार्यक्रमात आयुक्तांनी ही हतबलता जाहीर केली.
वसई-विरार शहरांत हजारो बावखळे आहेत. नैसर्गिक तयार झालेली पाण्याची विहीर म्हणजे बावखळ. सध्या ही बावखळे नामशेष होत आहेत. राज्यासह देशाच्या अनेक भागांत उद्भवलेला पाणीप्रश्न आणि त्या अनुषंगाने आवश्यक जलसंवर्धनाबाबतची गरज या बाबी लक्षात घेता वसई-विरार शहर महापालिकेच्या माध्यमातून एका सभेचे आयोजन करण्यात आले होते. जलपर्यावरण व भूमिगत जलस्रोतांचे संवर्धन हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पूर्वीपासून वसईच्या ग्रामीण भागात बावखळे मोठय़ा प्रमाणावर होती. कालांतराने अनेक बावखळे नष्ट झाली.
सध्या पाणीटंचाईची झळ सोसावी लागत असल्याने पाण्याच्या स्रोतांचे संवर्धन करणे व भूमिगत जलपातळी वाढविण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रक्रियेत बावखळे संवर्धन करण्याची गरज आहे. यासाठीच नगरसेविका प्राची कोलासो यांनी सोमवारी ‘बावखळे संवर्धन- महापालिकेची भूमिका’ या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते. त्यात बावखळे संवर्धन करण्यासाठी निधी नसल्याचे आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले.
लोकसहभागातून बावखळे वाचवा, असे आवाहन त्यांनी केले. महापौर प्रवीणा ठाकूर यांनीही आदर्श नागरिक बना, बावखळ्यात कचरा, माती, सांडपाणी टाकू नका. ती बुजवू नका, असे आवाहन त्यांनी केले. पालिका इतर कामांसाठी कोटय़वधी रुपयांची तरतूद करत असते; परंतु बावखळे वाचवण्यासाठी त्यांच्याकडे निधी मात्र नाही, अशी टीका विरोधकांनी केली.