राज्य सरकारच्या संकल्पनेचा ग्राहकांना फायदा;परिसरातील किरकोळ विक्रेत्यांचे ‘भाव’ही उतरले

राज्य सरकारच्या पुढाकाराने ठाण्यात सुरू झालेल्या स्वस्त भाजी केंद्रातील दरांची स्पर्धा उभी राहिल्याने आसपासच्या परिसरातील किरकोळ विक्रेत्यांनीच आठवडय़ाच्या प्रत्येक शनिवारी दर कमी करण्यास सुरुवात केल्याचा दावा या आठवडी बाजाराच्या आयोजकांनी केला आहे. शासनाच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना फायदा होतोच आहे. शिवाय किरकोळ बाजारातील मनमानीलाही अटकाव घालता येणार आहे. शासनाच्या आठवडा बाजारात ठाणेकरांकडून आठवडाभराची भाज्यांची खरेदी केली जात आहे. हे लक्षात आल्याने गावदेवी बाजाराच्या लगत असलेले किरकोळ विक्रेत्यांनी दर कमी केला आहे, असा दावा ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना केला.

भाज्यांचे किरकोळ दर आटोक्यात राहावेत तसेच शेतकऱ्यांनाही नफा मिळावा यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेऊन स्वस्त भाजी विक्री केंद्राची संकल्पना पुढे आणली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या नियंत्रणातून शेतकऱ्यांना मुक्ती मिळावी आणि मुंबई, ठाण्यासारख्या महानगरांमधील ग्राहकांपर्यंत त्यांना थेट पोहोचता यावे यासाठी आठवडी बाजारपेठांची संकल्पना पुढे आणण्यात आली आहे. ठाणे महापालिकेने असे बाजार भरविण्यासाठी ठाण्यात गावदवी मैदान उपलब्ध करून दिल्याने संस्कार आणि पणन महामंडळाच्या पुढाकाराने या ठिकाणी दर शनिवारी आठवडी बाजार भरविला जातो. या आठवडी बाजारात थेट शेतकरी येत असल्याने इतर बाजारांच्या तुलनेत येथील कृषिमाल दर्जेदार असतो, असा अनुभव आहे. त्यामुळे ठाणेकर ग्राहकांची येथे मोठी गर्दी होऊ लागली आहे. आठवडाभराची भाजी एकाच दिवशी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना असते. त्यामुळे किरकोळ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे स्वस्त भाजी विक्री केंद्रातील दरांप्रमाणेच किरकोळ विक्रेते दरांची आखणी करताना दिसत आहेत, असा दावा ठाण्याचे आमदार आणि आयोजक संजय केळकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना केला.

भाज्यांच्या दर वाढीवर उपाय म्हणून शासनाने शेतकऱ्यांना ग्राहकांच्या दारापर्यंत आणले. सरकारने सुरू केलेला उपक्रम फोल ठरविण्यासाठी ठाण्यातील किरकोळ व्यापाऱ्यानी भाज्यांच्या दरामध्ये लक्षणीय घट केल्याचा आरोप आमदार संजय केळकर यांनी केला. गेले अनेक दिवस शंभरीच्या पटीतील भाज्यांचे दर अचानक कसे काय कमी झाले, असा सवाल त्यांनी केला.

वर्षांनुवर्षे शेतकरी शेतातला माल आणून बाजार समितीमध्ये विकतो, व्यापारी त्याच्या मालाला सांगेल ती किंमत तो कबूल करतो. नाशिक, शिरुर, कोल्हापूर, पुणे, मुरबाड आदी ठिकाणांहून येणाऱ्या शेतकऱ्यांना बाजारामध्ये तग धरण्यासाठी किरकोळ भाजी विक्रत्यांशी लढा देण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. मालाची विक्री, वितरण, व्यवहार याचे कोणतेही प्रशिक्षण येथील शेतकऱ्यांना नाही. बाजारपेठेचे ठोकताळे आजही या शेतकऱ्यांना ज्ञात नाहीत. याचाच फायदा घेत किरकोळ विक्रेत्यांनी भाज्यांचे दर कमी करून शेतकऱ्यांच्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका आयोजकांकडून केली जात आहे.

स्वस्त भाजी केंद्रावर येणाऱ्या शेतकऱ्याला कितीही पाठबळ दिले तरी, याच परिसरामध्ये वर्षांनुवर्षे भाजी विक्रीचा व्यवसाय करणारे किरकोळ विक्रेते तसेच मक्तेदारी असलेले व्यापारी ती सुरळीत चालू देतील याची खात्री देता येत नाही. भाजी बाजाराचे हे बदलते स्वरूप शेतकऱ्यांपर्यंत योग्य वेळी पोहोचत नाहीत. त्यामुळे भाजीचे उत्पादन, साठवणूक आणि वितरण याचे व्यावसायिक गणित ठरवताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, असा दावाही आयोजकांनी केला.