फ्लॉवर-कोबी ४५ रुपये किलो; वांगी, भेंडी, टोमॅटो ६० ते ८० रुपयांवर
एकीकडे दुष्काळाच्या झळांनी राज्य होरपळत असतानाच कडक उन्हानेही आता डोके वर काढले आहे. याचा एकत्रित परिणाम भाज्यांच्या किमतीवर होताना दिसत असून एरवी एप्रिल-मे महिन्यात महागणाऱ्या भाज्या मार्चच्या पंधरवडय़ातच भाव खाऊ लागल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारात आठ ते दहा रुपयांच्या दरात विकल्या जाणाऱ्या फ्लॉवर व कोबी या भाज्या प्रत्यक्षात स्वयंपाकघरात येईपर्यंत ४० ते ४५ रुपये किलो दराने विकल्या जात आहेत. तर भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची या भाज्यांचेही दर ६० ते ८० रुपये किलोपर्यंत वाढले आहेत. त्यामुळे आधीच पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या सामान्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. त्यातच आता पेट्रोल-डिझेलच्या दरांतही वाढ झाल्याने सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींचा भडका उडण्याची चिन्हे आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या अखेपर्यंत वाशीच्या घाऊक बाजारात भाज्यांची आणि विशेषत पालेभाज्यांची भरपूर आवक होती. त्यामुळे बाजारात भाज्यांची स्वस्ताई होती. परंतु उन्हाच्या झळा वाढू लागताच फ्लॉवर, कोबी, टोमॅटो, भेंडी, वांगी अशा सर्वच भाज्यांचे घाऊक आणि किरकोळ दर दुपटीने वाढले आहेत. विशेष म्हणजे, किरकोळ बाजारात गवार, फरसबी, वाटाणा आणि घेवडय़ासारख्या भाज्यांनी तर किलोमागे शंभरी गाठली आहे. उन्हाळा आणि दुष्काळ यामुळे ही दरवाढ झाल्याची कारणे दिली जात आहेत. आगामी काळात भाज्या आणखी महाग होतील, अशी शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
पुणे आणि नाशिक या जिल्ह्य़ांतून मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना भाज्यांचा घाऊक पुरवठा होत असतो. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्याने भाजीपाल्याच्या उत्पन्नावर प्रतिकूल परिणाम होतो. त्यामुळे साधारणपणे एप्रिल, मे महिन्यात भाज्यांचे दर वाढतात. यंदा मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच दरवाढ होऊ लागल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कधी दुष्काळ तर कधी अवकाळी पाऊस अशा ऋतुचक्राचा फटका भाज्यांच्या उत्पादनाला बसत आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक व्यापारी बाबाजी पोखरकर यांनी दिली.

महागाईला प्रारंभ
’ वाशी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाज्यांची आवक गेल्या काही दिवसांपासून घटल्यामुळे ठरावीक भाज्यांचे दर वाढू लागले आहेत
’ वाशी आणि कल्याणच्या घाऊक बाजारात फ्लॉवर, कोबी अशा भाज्या अजूनही आठ ते दहा रुपयांनी विकल्या जात असल्या, तरी किरकोळ बाजारात हेच दर ४० ते ४५ रुपयांच्या आसपास आहेत
’ आवक मंदावल्याने घाऊक बाजारात उत्तम प्रतीची भेंडी ३० रुपये, तर टोमॅटोच्या दरांनी १५ रुपयांपर्यंत उडी घेतली आहे
’ किरकोळ बाजारात भेंडी, फरसबी, टोमॅटो, वांगी, ढोबळी मिरची अशा प्रमुख भाज्या किलोमागे ६० ते ८० अशा वाढीव दरांनी विकल्या जात आहेत
’ घाऊक बाजारात वांग्याचे दर ३० ते ४० रुपयांच्या आसपास असून किरकोळीत या दरांनी पन्नाशी गाठली आहे

पेट्रोल तीन रुपयांनी तर डिझेल दोन रुपयांनी महाग
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किमती आणि रुपया व डॉलर यांच्यातील विनिमय दरातील वाढत्या तफावतीच्या पाश्र्वभूमीवर बुधवारी देशांतर्गत तेलउत्पादक कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे तीन रुपये सात पैसे व एक रुपया ९० पैसे अशी वाढ केली. उल्लेखनीय म्हणजे या महिन्याच्या सुरुवातीलाच पेट्रोलच्या दरात तीन रुपये दोन पैशांनी कपात करण्यात आली होती. मात्र, डिझेलच्या दरात जानेवारीपासून सलग तिसऱ्यांदा वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निर्णय बुधवारी मध्यरात्रीपासून अंमलात आणण्यात आला आहे.