आवक घटल्याने भेंडी, गवार, वांगी, फ्लॉवर ८० रुपये किलो; सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडणार
दुष्काळाच्या झळांमुळे उत्पादनावर परिणाम होऊन भाज्यांचे दर गगनाला भिडू लागले असतानाच काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे सर्वसामान्यांचे जमा-खर्चाचे गणित बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांत झालेल्या पावसाचा फटका भेंडी, शिमला मिरची, गवार, वांगी, फ्लॉवर या भाज्यांना बसला असून आवक घटल्याने किरकोळ बाजारात त्या किमान ८० रुपये किलो या दराने विकल्या जाऊ लागल्या आहेत. पावसाचा काकडी, टोमॅटो, कोबी या पिकाला मात्र फायदा झाला आहे.
यंदा दुष्काळाची चर्चा सर्वत्र असल्याने मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून भाज्यांचे दर वाढू लागले आहेत. एप्रिल महिन्याच्या मध्यमावर उत्तम प्रतीच्या प्रमुख भाज्यांनी किरकोळ बाजारात साठी ओलांडल्याचे चित्र होते. भेंडी, वाटाण्यासारख्या बिगर हंगामी भाज्या तर शंभरीपलीकडे पोहचल्या आहेत. त्यातच गेल्या आठवडय़ात झालेल्या अवकाळी पावसामुळे ही महागाई भडकेल, असे चित्र आहे.
नाशिक जिल्ह्य़ात अचानक पडलेल्या गारांच्या पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने मार्केटमधील आवक ५० टक्क्यांनी घटली आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे साहाय्यक सचिव यशवंत पाटील यांनी ‘ठाणे लोकसत्ता’ला दिली. भाज्यांचा दर्जा उच्च प्रतीचा नसल्याने किरकोळ व्यापाऱ्यांकडून खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्यांचा तुटवडा निर्माण होऊन दरवाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. गारांच्या पावसामुळे फरसबी, गाजर, दुधीभोपळा, वांगी, शिमला मिरची यांसारख्या भाज्यांचे नुकसान झाले आहे. कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज भाज्यांनी भरलेल्या १०० गाडय़ा येतात. सध्या दिवसाला ५० ते ६० ट्रकच माल येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

फरसबीला सर्वात फटका
फरसबीचे मोठे उत्पादन नाशिक जिल्ह्य़ात घेतले जाते. येथे गारांचा पाऊस पडल्याने पिकाचे नुकसान झाले. फरसबीची भाजी ही नाशवंत मालामध्ये गणली जाते. जास्तीचे पाणी लागले तरी भाजी लवकर खराब होते. भाजी खराब झाल्याने नाशिकमधून माल येण्याचे प्रमाण अत्यल्प बनले आहे. जो माल आला तोही खराब असल्याने विक्रेत्यांनी तो घेणे पसंत केले नाही. शिवाय चायनीज विक्रेते, हॉटेल व्यावसायिक यांनी त्या मालाची आधीच बोलणी करून ठेवल्याने काही विक्रेत्यांना हवा असूनही तो माल घेता आला नाही. यामुळे किरकोळ मार्केटमध्ये फिरताना गृहिणींना फरसबी मिळालीच तर १६० रुपये किलोने मिळत आहे.
शर्मिला वाळुंज,