पुणे, नाशिकहून आवक घटल्याचा परिणाम; मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशच्या भाज्यांच्या मागणीतही वाढ
दुष्काळाचे परिणाम राज्यातील भाजीव्यवसायावरही दिसू लागले असून गेल्या काही दिवसांपासून पुणे तसेच नाशिक जिल्ह्यांतून होणारी भाज्यांची आवक कमालीची रोडावू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या राज्यांतून होणाऱ्या भाज्यांच्या आवकवर मुंबई, ठाण्यातील नागरिकांची गुजराण होत आहे. अहमदाबाद, रायपूर, ग्वाल्हेर यांसारख्या भागांतून भाजीचे अडीचशे ते तीनशे ट्रक दररोज मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी येथील मंडईत दाखल होत आहे. यातही गुजरातमधून येणाऱ्या भाजीचे प्रमाण लक्षणीय आहे.
राज्यातून होणारी भाज्यांची आवक घसरते तेव्हा परराज्यातील भाज्यांवर मुंबईतील पुरवठय़ाचा डोलारा उभा राहातो, हा तसा जुनाच अनुभव आहे. यंदा दुष्काळामुळे हे चित्र ठसठशीतपणे जाणवू लागले आहे. साधारण पाच वर्षांपूर्वी आलेल्या फयान वादळानंतर राज्यात अशाच प्रकारची भाजी टंचाई निर्माण झाली होती. तेव्हाही परराज्याने मुंबईकरांना मदतीचा हात पुढे केला होता. यंदा मात्र पुरवठय़ाचा अर्धाअधिक डोलारा परराज्यातून येणाऱ्या भाज्यांवर उभा राहात असल्याचे पाहून व्यापारीही चक्रावले आहेत. आवक मंदावल्याने जवळपास सर्वच भाज्यांचे दर वाढले आहेत. भेंडी, गवार, वाटाणा यांसारख्या भाज्यांच्या किरकोळ दरांनी शंभरी ओलांडली असून कारली, कोबी, काकडी यांसारख्या रोजच्या वापरातील भाज्याही महागल्या आहेत. दुष्काळाच्या नावाने किरकोळ बाजारात ग्राहकांची अक्षरश लूट सुरू असली तरी घाऊक बाजारात अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही, असा दावा वाशी येथील घाऊक व्यापारी गोपीनाथ मालुसरे यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. परराज्यातून होणारी भाज्यांची आवर हे त्यामागील प्रमुख कारण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईकरांना मोठय़ा प्रमाणावर पुणे तसेच नाशीक जिल्ह्य़ातून भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. एरवी या भागातून भाजीपाल्याने भरलेले सरासरी ५०० ते ६०० ट्रक दररोज वाशीच्या घाउक बाजारात येत असतात. हा भाजीपाला पुढे मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच वेगवेगळ्या उपनगरांमध्ये वितरित होत असतो. यावेळी मात्र राज्यातून वाशीतील घाऊक बाजारात भाजीपाल्याने भरलेले जेमतेम २५० ते ३०० ट्रक, टेम्पो येत आहेत. गुजरात, मध्यप्रदेश यांसारख्या राज्यातून येणाऱ्या २०० ते २५० गाडय़ांमुळे मुंबई, ठाण्यातील घाऊक भाज्यांचे गणित अजूनही आटोक्यात आहे, अशी माहिती बाजार समितीमधील वरिष्ठ सूत्रांनी दिली. अहमदाबाद, वडोदरा, ग्वाल्हेर, बंगळुरु यांसारख्या भागांमधून सध्या मुंबई, ठाण्यास सर्वाधिक आवक होते आहे. प्रामुख्याने वाटाणा, गाजर, कोबी, फ्लॉवर यांसारख्या भाज्यांचा यात समावेश आहे.