अपूर्णावस्थेतील वाहनतळावर पावसाचे पाणी

अंबरनाथची एकेकाळची सांस्कृतिक ओळख असलेल्या यशवंतराव चव्हाण खुले नाटय़गृहाच्या ठिकाणी पालिकेने वाहनतळ उभारण्याचे ठरवल्यानंतर त्याचे काम सूरू झाले खरे, मात्र तीन वर्षांपासून रखडलेल्या या कामाला मुहूर्त लागताना दिसत नाही. त्यातच पावसामुळे या अपूर्णावस्थेत असलेल्या वाहनतळात पाणी तुंबले असून येथे होत असलेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बंदिस्त नाटय़गृह आणि वाहनतळ उभारण्यासाठी खुले नाटय़गृह तोडण्यात आले. मात्र त्यामुळे आता नागरिकांची अवस्था ‘तेलही गेले आणि तूपही’ अशी झाली आहे.

तीन वर्षांपासून एनकेनप्रकारेण या वाहनतळाचे काम रखडतेच आहे. सध्या या वाहनतळाचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. मात्र त्याचे योग्यप्रकारे व्यवस्थापन न झाल्याने येथे सध्या पाणी तुंबले आहे. शहरवासीयांना डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साचू न देण्याचे आवाहन करणारे पालिका प्रशासन मात्र या वाहनतळाच्या प्रश्नाकडे मात्र लक्ष देताना दिसत नाही. त्यामुळे येथे साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. यामुळे आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता अधिक व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे तातडीने यावर उपाय शोधावा अशी मागणी आता पुढे येते आहे.

बदलीनंतर संथगती

अंबरनाथला वर्षभरापूर्वी लाभलेले कार्यक्षम मुख्याधिकारी गणेश देशमुख यांच्या कार्यकाळात वाहनतळाच्या कामाला उशिराने का होईना गती मिळाली होती. त्यांनी हे वाहनतळ ३१ मेपर्यंत पूर्ण होऊन नागरिकांसाठी उपयोगात येईल असे सांगितले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांची बदली झाल्याने या वाहनतळाचे काम रखडल्याचे बोलले जाते. यासह शहरातील इतर कामांनाही खीळ बसल्याचे स्पष्ट झाले आहे.