कल्याणमध्ये रविवारी रात्री दहा ते बारा वाजेदरम्यान मुरबाड रस्ता, उल्हासनगर, म्हारळ, मुरबाड रस्त्यावर वाहतुकीची अभूतपूर्व कोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र होते. सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेले रहिवासी वाहनांसह शहरात परतत होते. त्याच वेळी शहरातून अनेक वाहने बाहेर जात होती. या वर्दळीत अनेक दुचाकीस्वारांची वाहने चुकीच्या पद्धतीने शिरल्याने दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर वाहनांची अभूतपूर्व कोंडी झाली. त्याचा फटका लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसला.
कल्याण रेल्वे स्थानकाजवळील आगारातून रात्री साडेदहा वाजता अहमदनगरकडे आळेफाटामार्गे जाणारी बस सेंच्युरी क्लबपर्यंत पोहचेपर्यंत सव्वा बारा वाजले होते. एरवी हा प्रवास फक्त दहा मिनिटांचा आहे. रविवारी रात्री हा प्रवास काही तासांचा झाला होता. या मार्गावरील गल्लीबोळ वाहनांनी गजबजून गेले होते. दुचाकीस्वारांनी गर्दीत गाडय़ा रेटल्यामुळे रस्त्यांवरील कोंडी आणखी वाढली. त्यात सुट्टीचा दिवस आणि उशिराची वेळ असल्याने वाहतूक पोलिसांचा वानवा होती. त्यामुळे जागोजागी वाहने अडकून पडली होती. अनेक चाकरमानी रात्रीच्या प्रवासासाठी निघाली होती. अशी अनेक लांबच्या प्रवासाची मंडळी या वाहतूक कोंडीत अडकून पडली. वाहतूक विभागाचे कर्मचारी, जाणकार वाहन चालक यांनी पुढाकार घेऊन काही रस्ते, चौक मोकळे केल्यानंतर रस्त्यांनी काही प्रमाणात मोकळा श्वास घेतला. कल्याण आगारातून बाहेर पडताना मुरबाड दिशेने निघताना नेहमी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो, असे या मार्गावर नियमित ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले.

निसर्गरम्यतेसाठी गर्दी
रविवारी सुट्टीनिमित्त बाहेर गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यामुळे रविवारी या मार्गावर नेहमीच कोंडी होत असते. मुरबाड परिसरात अनेकांनी सेंकण्ड होम तसेच फार्म हाऊस विकत घेऊन गुंतवणूक केली आहे. त्यामुळे या निसर्गरम्य परिसरात ये-जा करणाऱ्यांची संख्या शनिवारी,रविवारी मोठी असते. रविवारी या मार्गावर वाहतूक कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ करण्याची आवश्यकता असते. प्रत्यक्षात मात्र तसे चित्र दिसत नाही.