पुलाच्या दुरुस्तीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील वर्सोवा पुलाच्या दुरुस्तीनिमित्ताने दररोज वाहतूककोंडी सहन करणाऱ्या वाहनचालकांना लवकरच या त्रासातून मुक्ती मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची मुदत यापूर्वी ३१ मे नक्की करण्यात आली असली तरी त्याआधीच ते पूर्ण करून वाहनचालकांना दिलासा देण्याचे प्रयत्न प्राधिकरणाकडून करण्यात येत आहेत.

खाडी पुलाच्या सिमेंट-काँक्रीटच्या एका गर्डरला तडे गेले असल्याने हा पूल गेल्या सप्टेंबर महिन्यात केवळ हलक्या वाहनांसाठीच खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गेले सहा महिने वाहनचालक वाहतूक कोंडीचा सामना करीत आहेत. पुलाची दुरुस्ती नेमकी कशा पद्धतीने करायची हे निश्चित करण्यात बराचसा अवधी वाया गेला. सुरुवातीला पुलाला खालच्या बाजूने भक्कम अशा लोखंडी चौकटीने आधार देण्याचे नक्की करण्यात आले होते; परंतु यामुळे पूल आणि खाडीचे पाणी यातील अंतर कमी होणार असल्याने मेरिटाइम बोर्डाने अशा पद्धतीच्या दुरुस्तीला परवानगी नाकारली. त्यानंतर पुलाला ताणलेल्या लोखंडी केबल्सचा आधार देण्याचे अंतिमत: नक्की झाले.

प्रत्यक्ष कामाला फेब्रुवारी महिन्यात सुरुवात झाली. या कामाची वेगवेगळ्या टप्प्यांत विभागणी करण्यात आली आहे. त्यातील काही टप्पे शंभर टक्के पूर्ण झाले आहेत तर काही टप्प्यांतील काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे.

नव्या पुलाला वन विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा

सध्याच्या जुन्या पुलाला सुमारे ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. हा पूल कमकुवत झाला असल्याने या ठिकाणी नवा पूल बांधण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार केंद्र सरकारकडून नव्या पुलाला मंजुरी देऊन त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुलाचे काम करणाऱ्या कंपनीसोबत करारनामादेखील करण्यात आला आहे; परंतु पूल बांधण्यासाठी वन विभागाच्या परवानगीची आवश्यकता असून ही परवानगी मिळाली की कंत्राटदाराला लगेचच कार्यादेश देऊन नव्या पुलाच्या उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे.

संपूर्ण दुरुस्तीचे काम येत्या १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नक्की करण्यात आले आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार काम पूर्ण करण्यास ३१ मेची मुदत देण्यात आली होती; परंतु निर्धारित वेळेआधीच ते पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

दिनेश अगरवाल, व्यवस्थापक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण