दिग्गज चित्रकारांसह विद्यार्थ्यांकडून शहर सुशोभीकरणाला हातभार

ठाण्यातील बेकायदा बांधकामांवर कारवाई करून परिसर अतिक्रमण मुक्त करण्याची मोहीम महापालिका एकीकडे राबवत असताना, शहराच्या सौंदर्यीकरणात भर पाडण्यासाठी दुसरीकडे हात झटू लागले आहेत. तंबाखू, गुटख्याच्या पिचकाऱ्या, कचरा, चित्रविचित्र पोस्टर्स, बेकायदा दवाखान्यांच्या जाहिराती यांनी विद्रुप झालेल्या शहरातील भिंतींवर आकर्षक चित्रे रंगवून शहराचा चेहरामोहरा बदलण्याचे काम शेकडो हातांमार्फत सध्या सुरू आहेत. महापालिकेने आखलेल्या भिंती रंगवा ठाणे सजवा या मोहिमेचा शुभारंभ येत्या रविवारी होत असला तरी या मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून दिग्गज कलावंत, विद्यार्थी, अबालवृद्धांचे जथ्थे मोक्याच्या ठिकाणी असलेल्या िभती रंगविण्याच्या कामात स्वतला झोकून देत आहेत.

या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कॅडबरी सेवा रस्त्याच्या भिंतीला नवी झळाळी देण्याचे काम सुरू आहे. येथील भिंतीवर अमूर्त चित्रे (अ‍ॅबस्ट्रॅक्ट पेटिंग), पान-फुलांची मनमोहक नक्षी, पक्ष्यांच्या थवे अशा चित्रांची माळ गुंफण्यात येत आहे. शहरातील सामाजिक संस्था, मान्यवर कलावंत, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थी तसेच मोठय़ा संकुलातील रहिवाशांच्या गटांनी मिळून रात्रीच्या वेळी या भिंती रंगविण्याचे काम सुरू केले आहे. काही कलाकारांनी ठाण्याविषयीच्या त्यांच्या संकल्पना भिंतीवर रेखाटल्या तर काहींनी ठाणे रेल्वे स्थानकाचे हुबेहूब चित्र येथे रंगविले आहे.

शाळा आणि गृहसंकुलातील बच्चेकंपनींना चित्रांचा साचा काढून त्यात रंग भरण्याचे काम सोपविण्यात आले आहे. काही बाल चित्रकारांनी आपल्या सुंदर कल्पना भिंत्तीचित्राच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही मोहीम यशस्वी करण्यासाठी ज्येष्ठ चित्रकार प्रा. डग्लस जॉन, प्रा. श्रीकांत खैरनार, शैलेश साळवी, समुद्रा पुरेकर, श्रेयस खानविलकर, किशोर नाडवडेकर, महेश कोली, नीलिमा कडे यांसारखे दिग्गज चित्रकार सहभागी झाले आहेत.

कॅडबरी कंपनी येथील भिंतीचे बदलेले रूप पाहून असंख्य ठाणेकरांनी या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती ‘पेंट दी वॉल’चे संयोजक आणि महापालिकेच्या शहर विकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद निबांळकर यांनी ‘लोकसत्ता ठाणे’ला दिली.

कॅडबरी जंक्शन येथील भिंत, पोखरण रोड नं.१, सिंघानिया शाळा, घंटाळी पथ, कोपरी बाराबंगला येथील भिंतीचे काम शेवटच्या टप्प्यावर आहे. या उपक्रमामुळे दिवसागणिक ठाणे शहराच्या सौंदर्यात भर पडणार असून ठाण्यासाठी ही ऐतिहासिक मोहीम म्हणावी लागेल, असा दावा या मोहिमेचे आणखी एक संयोजक कॅसबर ऑगस्टिन यांनी केला.

कोपरी येथील बारा बंगल्याजवळील भिंती रंगविण्याच्या कामाला नुकतीच सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले.

येत्या काळात श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची भिंत, नितीन जंक्शन उड्डाणपुलाचे खांब, धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वार, कोपरी सर्कल, कोपरी एसटी बस स्टॉप जवळची भिंत, कोपरी बस कार्यशाळा, कळव्यातील एसटी कार्यशाळा भिंत रंगविणार असल्याचे महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांनी स्पष्ट केले.