चहा पीत वीज, पाणी, रस्ते आणि शिक्षणाच्या समस्येवर निव्वळ गप्पांच्या वाफा न दवडता एखादं गावच दत्तक घेऊन सुविधा मिळवून देण्याचा निर्णय कल्याणच्या टिळक चौकातील चहाच्या टपरीवर रोज भेटणाऱ्या तरुणांनी घेतला आहे. ‘रॉयल टी समूह असे या गटाचे नाव आहे. वाडा तालुक्यातील खैरे आंबिवली गावचा विकास करून ‘चाय पे चर्चा’ हे केवळ पेल्यातील वादळ ठरणार नाही, याची खबरदारी या तरुणांनी घेतली आहे. यासाठी त्यांनी ग्रामीण भागात काही वर्षांपासून सामाजिक उपक्रमही हाती घेतला आहे आणि यापुढील सर्व उपक्रमही आंबिवलीसाठीच राबवण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.
पालघर जिल्ह्य़ात हे गाव आहे. वाडय़ापासून १४ किलोमीटर अंतरावर. पण १५ पाडय़ांनी मिळून बनलेल्या या गावात अद्याप वीज पोहोचलेली नाही. पाणीपुरवठय़ाची कोणतीही योजना नाही. पावसाळा संपला की रहिवाशांची पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू होते. डोक्यावर गढूळ पाण्याचे हंडे-घागरी घेऊन घरांपर्यंत नीट येण्याचीही सोय नाही. रस्तेच नाहीत तर डोक्यावरून पुरेसं पाणी आणणार कसं? गावाला जोडणारा प्रत्येक रस्ता दगड खड्डय़ांनी भरलेला आहे. ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीद कायम ठेवत राज्य परिवहन महामंडळाने बस सुरू केली आहे; पण पावसाच्या माऱ्याने चाळण होत असलेले रस्तेच गायब होत असल्याने तीही बंद पडते. त्यामुळे गावाचा उर्वरित जगाशी असलेला संपर्क तुटतो, अशी बिकट परिस्थिती आहे. प्राथमिक गरजांसाठी चार हजार लोकांच्या वस्तीची ससेहोलपट २१व्या शतकातही कायम आहे, परंतु नव्वद टक्के समाज आदिवासी असलेल्या आंबिवलीची माहिती तरुणांना काही दिवसांपूर्वी कळली. म्हणूनच गावाचा ‘मीटर, गटर व वॉटर’च्या दृष्टीने विकास करण्याचे त्यांनी ठरवले.

शकुंतलेला पुढे शिकवायचे..
गावातील श्रीमती सुरेखा एच. गार्डी स्वजन विद्यालयात खैरे आंबिवली आणि सहा ते सात किलोमीटर अंतरावरील गावांमधून विद्यार्थी येथे शिकायला येतात. दीपचंदभाई गार्डी यांनी शाळा इमारत बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला, तर गावातीलच श्रीकृष्ण देशमुख यांनी जागा दिली. शाळेचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागतो, मात्र प्रतिकूल परिस्थितीमुळे मुले पुढे शिकू शकत नाहीत. वीटभट्टी मजुराची मुलगी असलेली दहावीतील शकुंतला रवींद्र भोये हिला नववीत ९८ टक्के गुण मिळाले आहेत. तिच्या पुढील शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ‘रॉयल टी’ समुहाने स्वीकारली आहे.

प्रशांत मोरे, ठाणे</strong>