दर बुधवारी वसई-विरार महापालिकेच्या एका प्रभागात अवैध बांधकामांवर कारवाई
शहरातील अनधिकृ त बांधकामांवर महापालिकेने सतत कारवाई सुरू केलेली आहे. पण यापुढे दर बुधवारी एका प्रभागात मोठी कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. पालिकेची सर्व यंत्रणा दर बुधवारी एकाच प्रभागातील अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करणार आहेत.
वसई-विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर बेकायदा बांधकामे झाली आहेत. पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दररोज सर्व प्रभागातील बेकायदा बांधकामे तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार ही कारवाई होत आहे. परंतु आता ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्याचे पालिकेने ठरवले आहे. दर बुधवारी एकाच प्रभागात मोठी कारवाई केली जाणार आहे. सर्वच्या सर्व नऊ प्रभागांतले साहाय्यक आयुक्त, अभियंते, अतिक्रमणविरोधी पथक एकत्र येऊन अनधिकृत बांधकामे तोडणार आहेत. या मोहिमेबाबत माहिती देताना आयुक्त सतीश लोखंडे यांनी सांगितले की, एकाच प्रभागातील बांधकामे तोडल्याने तांत्रिक अडचण आणि आरोप होणार नाहीत. आम्ही तोडकामासाठी बुधवार हा दिवस निश्चित केला असून गुरुवारी संबंधित बिल्डरांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
या अनोख्या मोहिमेत बुधवारी पेल्हार विभागातील बांधकामे तोडली जाणार आहेत. दर बुधवारी नियमितपणे ही मोहीम राबविली जाणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामे करणाऱ्यांना बुधवारची दहशत निर्माण होणार आहे.