निवडणूक काळात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाने दरवर्षीप्रमाणे यंदाही मध्य रेल्वे स्थानकांवर उद्घोषणांना सपाटा लावला असला तरी ठाणे पलीकडे असलेल्या स्थानकांमध्येही ‘मुंबई महापालिकेसाठी मतदान करा,’ अशा आवाहनाच्या उद्घोषणा कानी पडू लागल्या आहेत. मुंबईसह ठाणे आणि उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुका येत्या २१ फेब्रुवारी रोजी होत आहेत. त्यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, शहाड, उल्हासनगर, कल्याण या स्थानकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांची नावे घेऊन या उद्घोषणा कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई, ठाणे, पुणे व नाशिकसह राज्यात दहा महापालिकांच्या निवडणुका पुढील महिन्यात होत आहेत. मुंबई महापालिका निवडणुकीत मतदानाची आकडेवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोगाच्या जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. मतदानाचा टक्का वाढावा यासाठी चाकरमान्यांना एक दिवसाची सुट्टी यापूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. या आवाहन प्रक्रियेचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने रेल्वे प्रशासनाच्या मदतीने मध्य, पश्चिम तसेच हार्बर रेल्वे स्थानकांमध्ये मतदारांना आवाहन करणाऱ्या उद्घोषणा सुरू केल्या आहेत. या उद्घोषणा ठाणे, दिवा, कल्याण, डोंबिवली, कोपर आदी रेल्वे स्थानकातही दिल्या जात आहेत. मात्र, या स्थानकांमध्ये मतदानाच्या आवाहनासाठी मुंबई महापालिकेचा गजर वाजविल्याचे चित्र आहे.

ठाणे-उल्हासनगराचा आग्रह

मध्य रेल्वे प्रशासनाने केवळ मुंबई पालिकांच्या निवडणुकांची उद्घोषणा सुरू केल्याने ठाणे, उल्हासनगरातील काही लोकप्रतिनिधींनी स्थानिक प्राधिकरणांचा विचार करूनच या उद्घोषणा दिल्या जाव्यात, अशी मागणी रेल्वे प्रशासन तसेच निवडणूक आयोगाकडे केली आहे.

रेल्वे प्रशासनाचा महापालिका निवडणुकांमध्ये कोणताही सहभाग नाही. मुंबई निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवाहन करण्याविषयीची उद्घोषणा करण्याचे निवेदन आल्याने तशी उद्घोषणा रेल्वे स्थानकात दिली जात आहे. ठाणे निवडणूक आयोगाचे असे  निवेदन आल्यास या उद्घोषणा स्थानिक केल्या जातील.

-नरेंद्र पाटील, मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी.