एसटीच्या बंद मार्गावरून सेवा सुरू करण्यात अडचणरी; एसटी आगारांच्या जागा देण्यात चालढकल

वसई-विरार शहरातून १ एप्रिलपासून एसटीची बससेवा बंद करण्यात येणार आहे. त्या मार्गावरून बससेवा सुरू करण्यास महापालिका प्रशासनाने हिरवा कंदील दिला असला तरी त्यांच्या मार्गात अडचणी उभ्या राहिल्या आहेत. एसटी आगारांच्या जागा महापालिकेच्या ताब्यात आल्या तरच बससेवा सुरू करेल, असे पालिकेने म्हटले होते. मात्र अद्याप एसटी आगारांच्या जागा ताब्यात आलेल्या नाहीत. एसटीने त्यांच्या आगाराची जागा पालिकेला वापरण्यासाठी दिल्याशिवाय आम्ही त्या मार्गावरून बससेवा सुरू करू शकत नाही, अशी ठाम भूमिका पालिकेने घेतली आहे.

वसई-विरार शहरातील २५ मार्गावरून एसटीने आपली सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. १ जानेवारी २०१७ पासूनच ही एसटी सेवा बंद होणार होती; परंतु सर्वपक्षीय जनआंदोलनानंतर ही बससेवा ३१ मार्चपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय एसटीने घेतला आहे. ३१ मार्चनंतर पुढे काय, असा प्रश्न होता. परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पालिका आयुक्तांनी १ एप्रिलपासून एसटीने बंद केलेल्या मार्गावरून पालिकेची बससेवा चालवली जाणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र या निर्णयाला अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट लिमिटेड कंपनी या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. त्यांच्याकडे पुरेशा बसचा अभाव आहे; परंतु सगळ्यात मोठी अडचण जागेची भेडसावत आहे. एसटीच्या जागा भाडेतत्त्वावर पालिकेने मागितल्या आहेत. शासनाने तसे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप या जागा एसटी महामंडळाने पालिकेला हस्तांतरित केलेल्या नाहीत. जागा मिळाल्याशिवाय त्या मार्गावर सेवा देता येणार नाही, असे पालिकेने सांगितले.

एसटी जागा देत नाही आणि पालिका तांत्रिक अडचणींमुळे सेवा सुरू करू शकणार नाही. यामुळे वसईकरांना १ एप्रिलपासून पुन्हा मोठय़ा गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.

खासगी ठेकेदाराला जागा

एसटी महामंडळाने सुरुवातीपासूनच पालिकेशी असहकार धोरण पुकारले आहे. वसई पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ एसटीचा नवघर आगार आहे. या आगाराच्या जागेतून पालिकेच्या परिवहन सेवेच्या बसना वळण घेण्यासाठीदेखील एसटीने मनाई केली आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरून वळण घेत असताना मोठी वाहतूक कोंडी होत असते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पालिकेला विरोध करणाऱ्या एसटीने या आगारातील जागा खासगी ठेकेदाराला वाहनतळ चालवण्यासाठी दिली आहे. जो ठेकेदार पैसे कमावतो, त्याला एसटीने जागा दिली आहे. मात्र लोकांची सेवा करणाऱ्या पालिकेला एसटी जागा देत नाही, अशी खंत सभापती भरत गुप्ता यांनी व्यक्त केली आहे.

एसटी आगाराच्या जागा मिळाल्याशिवाय एसटीच्या मार्गावर आम्हाला सेवा देणे शक्यच होणार नाही. फेब्रुवारी महिना अध्र्यावर आला तरी अद्याप एसटीने याबाबत काहीच हालचाल केलेली नाही. शासनाचा निर्णय झाला आहे तरी एसटी जागा देत नाही. आम्हाला या जागा भाडेतत्त्वावर हव्या आहेत, तरी एसटी सहकार्य करत नाही.

भरत गुप्ता, परिवहन समितीचे सभापती