वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनासाठी ठाणे वाहतूक पोलिसांचा नवा उपक्रम

ठाणे, भिवंडी तसेच कल्याण या शहरातील मुख्य जंक्शन वाहतूक कोंडीमुक्त व्हावेत यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी आता बिनतारी संदेश (वॉकी-टॉकी) यंत्रणेचा अनोखा प्रयोग राबविण्यास सुरुवात केली आहे. जंक्शनच्या प्रत्येक मार्गावर उभे असलेल्या वाहतूक पोलिसांकडे ही यंत्रणा देण्यात आली असून, या माध्यमातून एकमेकांशी समन्वय साधून पोलीस कर्मचारी जंक्शनवरील वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करीत आहेत.

जंक्शनवर एकाच वेळी दोन्ही मार्गावरून वाहने आल्यामुळे जंक्शनवर कोंडी होऊन त्या भागातील वाहतूक ठप्प होत असल्याचे वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास आले होते. या पाश्र्वभूमीवर एकावेळी एकाच मार्गावरील वाहने सोडणे शक्य व्हावे म्हणून वाहतूक पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे.  ठाणे ते बदलापूपर्यंतच्या शहरांचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्यामुळे शहरातील वाहनांच्या संख्येतही मोठी वाढ होत आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असली तरी अनेक ठिकाणी रस्त्यांची रुंदी वाढविणेही आता शक्य नाही. त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून  बिनतारी संदेश (वॉकी-टॉकी) यंत्रणेच्या माध्यमातून शहरांमधील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

ठाणे, भिवंडी तसेच कल्याण या शहरांतील मुख्य जंक्शनवरून अनेक भागात जाण्यासाठी पाच ते सहा मार्ग असतात. याशिवाय, काही भागात जंक्शनजवळील रस्त्यांना जोडणारे छोटे रस्तेही असतात.  मात्र, या जंक्शनवरील वाहतुकीचे योग्यप्रकारे नियोजन होत नसल्यामुळे काही वेळेस दोन किंवा तिन्ही मार्गावरील वाहने एकाच वेळी जंक्शनवर येतात. त्यामुळे जंक्शनवरील वाहतूक ठप्प होते.गेल्या दहा दिवसांपासून ठाणे, कल्याण, भिवंडी शहरातील जंक्शनवर बिनतारी संदेश यंत्रणेचा प्रयोग राबविण्यात येत असून त्यामुळे वाहतूक कोंडी सुटण्यास काहीशी मदत झाली आहे.

येथे बिनतारी यंत्रणा

ठाणे शहरातील तीन हातनाका, कॅडबरी, माजिवाडा, कोपरी, भिवंडी शहरातील माणकोली, रांजनोली, कल्याण शहरातील दुर्गाडी आणि कल्याण फाटा या भागातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना बिनतारी संदेश यंत्रणा देण्यात आल्या आहेत.

ठाणे, भिवंडी, कल्याण या  शहरातील मुख्य जंक्शनवर असणाऱ्या प्रत्येक वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांकडे बिनतारी संदेश यंत्र (वॉक-टॉकी) देण्यात आली आहे. या माध्यमातून वाहतुकीचे नियमन करतात. जंक्शनवर एकाच वेळी दोन किंवा तीन मार्गावरून वाहने येऊ नयेत म्हणून कोणत्या मार्गावरून वाहतूक सोडायची आहे आणि कोणत्या मार्गावरील वाहतूक रोखून धरायची आहे, यासंबंधी ते एकमेकांशी संपर्क साधतात.

 -संदीप पालवे, उपायुक्त