‘प्रभाग’फेरी : सावरकरनगर, लोकमान्यनगर

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारीत येत असलेल्या डोंगराच्या कुशीत वसलेला परिसर म्हणून सावरकरनगर, लोकमान्यनगर विभागाची ओळख आहे. म्हाडाच्या बैठय़ा चाळी, इमारती आणि झोपडपट्टी असा हा परिसर आहे. ‘मामा-भाचा’ डोंगरावरून संपूर्ण ठाणे शहराची झलक कॅमेऱ्यात टिपता येत असल्याने पर्यटकांचा ओढा अनेकदा या परिसराकडे आहे; मात्र परिसराजवळील हिरव्या श्रीमंतीशिवाय या परिसरात विशेष आकर्षण जाणवत नाही. पूर्वीचे जुने गाव असे बिरुद मिरवणाऱ्या या भागाचे गेल्या काही वर्षांत शहरीकरण झाले खरे; पण अपुऱ्या नियोजनामुळे या परिसरात विकासाची दारे कायम बंद असल्याची दिसून येतात.

झोपडपट्टी आणि दाटीवाटीचा परिसर असलेल्या या भागात विकासकामे करण्यासाठी पुरेसा वाव राहिलेला नाही. या परिसरालगत लक्ष्मी पार्क, कोरस, दोस्ती तसेच म्हाडाच्या इमारती असून या भागाचा नियोजनबद्घ विकास झाला आहे. असे असले तरी या भागात वाहतूक कोंडीची समस्या मोठी आहे. या भागातील नागरी वस्ती वाढत असताना रस्ते रुंदीकरणाकडे फारसे लक्ष देण्यात आलेले नाही. चिंचोळे रस्ते, अस्वच्छता, पाणीटंचाई, विजेची समस्या, ध्वनिप्रदूषण, फेरीवाल्यांच्या पथारी अशा समस्यांनी गजबजलेल्या परिसरात रहिवासी दाटीवाटीने राहतात. वर्षांनुवर्षे या परिसरात वाढलेला बेकायदा बांधकामांचा विळखा अद्याप संपुष्टात आलेला नाही. वनविभागाच्या जागेत अनधिकृत बांधकामे वाढत गेल्याने संरक्षक भिंत बांधण्यात आली, मात्र या प्रयत्नानंतरही बराचसा भाग बेकायदा बांधकामांनी वेढलेला आहे. सावरकरनगर, लोकमान्यनगर प्रभाग समिती क्षेत्रात शास्त्रीनगर, परेरानगर, रामबाग, यशोधननगर हा परिसर आहे. या सर्व परिसरातील एकत्रित समस्यांचा विचार केल्यास कित्येक वर्षे या परिसरातील नागरिक सुधारणेच्या प्रतीक्षेत आहेत.

रस्त्यावरील मासळी बाजार

लोकमान्यनगर परिसरातील लाकडी पूल भागाकडे जाणारा मार्ग अतिशय अरुंद आहे. या अरुंद रस्त्यावर दोन्ही बाजूंना बेकायदा इमारती असून याच रस्त्यावर मासळी बाजार भरतो. यशोधननगर, सावरकरनगर येथून नागरिक खरेदीसाठी येत असल्याने या भागात प्रचंड गर्दी असते. मासे विक्रेते रस्त्यावरच पाणी ओतत असल्याने  दरुगधी असते.

चौकातील वाहतूक कोंडी

यशोधननगर नाक्यावरून लोकमान्यनगर बस आगाराकडे जाणारा रस्ता असून याच चौकातून वर्तकनगरकडे जाणारा मार्ग आहे. अरुंद रस्त्यामुळे यशोधननगरच्या चौकात गर्दीच्या वेळी वाहतूक कोंडी होते. याच मार्गावरून टीएमटी बसची वाहतूक सुरूअसते. त्यामुळे या बसगाडय़ांच्या रस्त्यावर अक्षरश: रांगा लागतात. त्यात रस्त्यावरील दुतर्फा पार्किंगमुळे कोंडीत आणखी भर पडते.

शौचालयाची कमतरता

रामबाग परिसर मुख्य शहरापासून कमालीचा लांब असल्याने या परिसराचा फारसा विकास होऊ शकलेला नाही. तुलनेने जास्त लोकवस्ती या भागात असली तरी शौचालयाची पुरेशी सुविधा नाही. सावकरनगर परिसरात मात्र सर्वत्र मलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्यामुळे घरोघरी आता शौचालये आहेत. याशिवाय सावरकर-लोकमान्य हा परिसर काहीसा उंचावर असल्यामुळे या भागात पाणी समस्या प्रकर्षांने जाणवते. लोकवस्तीच्या मानाने अपुरा पाणीपुरवठा होतो.

अरुंद रस्त्यांवर वाहतूक रुंदावली!

सावरकरनगरमधील म्हाडा वसाहतींचा रखडलेला पुनर्विकास, लोकमान्यनगर पाडय़ांमधील अनेक बेकायदा बांधकामे, रामबागमधील पाण्याची टंचाई, शास्त्रीनगरमधील बेकायदा चाळींचे साम्राज्य यामुळे एकंदरीतच हा प्रभाग समस्यांच्या गर्तेत सापडल्याचे दिसून येते. लोकमान्यनगर, यशोधननगर या परिसरात अगदी दाटीवाटीने बेकायदा इमारती वसल्या आहेत. या  इमारतीच्या चिंचोळ्या रस्त्यातून वाहनांना मार्गक्रमण करणे जिकिरीचे असते. आपत्कालीन परिस्थितीत अग्निशमन दलाच्या वाहनाला या मार्गावरून जाण्यास अडथळा निर्माण होतो. त्या तुलनेत सावरकरनगर म्हाडा वसाहत आणि जुन्या गावात सुटसुटीत वातावरण आणि कमी समस्या दिसून येतात; मात्र या भागात गेल्या काही वर्षांत नागरीकरण झपाटय़ाने वाढल्याने तेथील अंतर्गत रस्त्यांवर वाहतूक कोंडीची समस्या जाणवू लागली आहे. येऊरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रामबाग परिसरात पाण्याची प्रचंड टंचाई जाणवत आहे. कोणत्याही वेळी मोठय़ा आवाजात सुरूअसणारे डीजे, रस्त्यावर मंडप उभारून कार्यक्रम साजरे केले जातात. वारंवार तक्रारी करूनही या प्रकाराला आळा बसलेला नाही. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ओवळा-माजिवडा मतदारसंघाचे आमदार प्रताप सरनाईक या दोन्ही शिवसेना नेत्यांच्या मतदारसंघात सावरकरनगर आणि लोकमान्यनगर परिसर येतो. त्यामुळे सावरकरनगर परिसर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे.

मनोरंजनाची वानवा

ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचे साधन, प्रभातफेरीसाठी सुनियोजित जागा परिसरात नसल्याने या प्रभाग समितीत नागरिकांकडून तशी मागणी जोर धरू लागली आहे.

प्रभाग क्रमांक – ६

आरक्षण      अ) – अनुसूचित जाती महिला

ब)  – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

क) – सर्वसाधारण महिला

ड) – सर्वसाधारण

एकूण लोकसंख्या – ६० हजार २८४

प्रभाग क्षेत्र –  लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, परेरानगर, रामबाग

प्रभाग क्रमांक – १४

आरक्षण

अ) – नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग

ब) – सर्वसाधारण महिला

क) – सर्वसाधारण महिला

ड) – सर्वसाधरण

एकूण लोकसंख्या – ५८ हजार ४६६

प्रभाग क्षेत्र – करवालोनगर, सावरकरनगर, यशोधननगर

लोकमान्यनगर परिसर मुळातच गजबजलेला परिसर आहे. कोणत्याही वेळेची मर्यादा न पाळता या भागात मोठय़ा आवाजात डीजे लावला जातो. लोकप्रतिनिधींनी या गोष्टींसाठी परिसरात नियमांची आखणी केल्यास या परिसरातील अवाजवी आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येऊ शकते.
संकेत चव्हाण, लोकमान्यनगर

या परिसरात पार्किंगची सोय नसल्याने नागरिकांची गैरसोय होते. कोणत्याही ठिकाणी पार्किंगचे नियोजन नाही. त्यामुळे कोणत्याही जागेत पार्किंग केली जाते. त्यामुळे अरुंद रस्त्यावर प्रचंड वाहतूककोंडी होते.
– राजू सटवे, सावरकरनगर

लोकमान्यनगर परिसरात लाकडी पुलाजवळ दिवसेंदिवस फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढलेले असले तरी याकडे दुर्लक्ष केले जाते. दोन्ही बाजूस फेरीवाल्यांचे अतिक्रमण असल्याने या परिसरात प्रचंड वाहतूककोंडी असते.

– निखिल जाधव, लोकमान्यनगर

अनेक वर्षांपासून या प्रभागातील नागरिकांना पाण्याची समस्या भेडसावते. पाण्याचे योग्य नियोजन केल्यास आणि वेळेची मर्यादा पाळल्यास मुबलक पाणीपुरवठा होऊ शकतो. लोकप्रतिनिधींनी या समस्येकडे लक्ष द्यायला हवे.

प्रतीक्षा भावे, सावरकनगर