भारत हा खेडय़ांचा, शेतीप्रधान संस्कृतीचा देश आहे. आपले सर्व सामाजिक जीवन, त्यातील गोष्टी, पौराणिक कथा या पाण्याशी निगडित आहेत. मानवी वसाहतीची सुरुवातच नदीकिनाऱ्यावर सुरू झाली. म्हणूनच आपल्या संस्कृतीमध्ये पाणी जपण्याला फार महत्त्व आहे. शक्य तेथे पाणी साठवण्याची पद्धत आपल्याकडे होती. राजस्थानमध्ये तलाव राखण्याची संस्कृती होती व आहे. राजेंद्र सिंह यांचा तरुण भारत संघ ‘जोहाड’ तलाव तयार करून नद्या बारमाही स्वच्छ पाण्याने वाहत्या करू शकतो. महाराष्ट्राच्या तुलनेत राजस्थान म्हणजे खूप कमी पावसाचा प्रदेश. अगदी वैराण वाळवंटी प्रदेश. पण तेथे महाराष्ट्राप्रमाणे खूप प्रमाणावर उत्तम शेती होते.
ग्रामीण भागात इंग्रजांच्या काळापर्यंत तरी लोक आपल्या भागातील तलाव सांभाळीत होते. गाळ काढत होते. यासाठी गावातील लोक एकत्र येत असत. इंग्रजांना प्रशासनाच्या दृष्टीने लोक एकत्र येणे योग्य वाटत नव्हते. त्यांनी पाण्याची जबाबदारी सरकारची ठरविली. त्यामुळे पाणी योजना कमी-जास्त प्रमाणात तयार केल्या. या सर्वामुळे तलावांची देखभाल झाली नाही. ते बुजले आणि हळूहळू जमिनीत पाणी मुरण्याची ठिकाणे कमी कमी होत गेली. भूजल पातळी खोलखोल जाऊ लागली. जिथे विहिरीला ४० ते ५० फुटाला पाणी लागत होते तिथे आज बोअरवेलला ४०० फुटांच्या खालीच जावे लागते.
आज शासन ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ मोहीम राबवत आहे. जलसंवर्धन व सिंचनाकरिता कोटय़वधी खर्च करीत आहे. अगदी कोकणाचा आपल्या जिल्ह्य़ाचा विचार केला तरी भातशेती करणे म्हणजे ‘पाणी अडवा- पाणी जिरवा’ नाही का? आज भातशेती परवडत नाही म्हणून बरेचसे शेतकरी, गावे भात लावत नाहीत. तेथे आत्ताच भूगर्भातील पाण्याची पातळी कमी आहे. गावातील विहिरींचे पाणी उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच संपते. भातशेतीचा प्रत्यक्ष फायदा म्हणजे मिळणारा तांदूळ व अप्रत्यक्ष फायदा जलसंधारण. या दृष्टीने भातशेतीकडे शेतकरी व प्रशासनाने पाहणे गरजेचे आहे. तांदूळ शेतकऱ्याचा तर पाणी शासनाचे. यासाठी जसे पाणी अडवा-पाणी जिरवा ही योजना नद्या-ओढय़ात राबवितात, तसे ती शेतीत राबवली म्हणजे मूलस्थानी जलसंधारण झाले, तर आपल्याकडे चांगल्या प्रकारचे व भरपूर पाणी उपलब्ध होऊ शकेल. यासाठी शेतकऱ्यांना भात लागवडीकरिता आर्थिक मदत दिली, तर भातशेती करणाऱ्यांचे प्रमाण नक्की वाढेल व अन्न, पाणी सुरक्षितता निर्माण होईल.
जमिनीत पावसाचे पाणी मुरण्यास मदत करणारे अनेक घटक आहेत. वनस्पतींचे आच्छादन- त्याखाली वाढणारी जीवसृष्टी-मातीचा प्रकार-उताराचे प्रमाण-पडणारा पाऊस हे महत्त्वाचे आहे. आपल्या भागातील भातशेतीचा विचार केला तर असे दिसते की, बी लागवडीपूर्वी जमिनीची भाजणावळ (राब) केला जातो. यासाठी माळावरील गवत, झाडांखालचा पालापाचोळा, शेण्या इ. गोष्टी जमवून त्या शेतात पसरवून जाळून जमीन भाजतात. याचा हेतू जमिनीवरील तणांचे बी जळून जावे व जमीन हलकी व्हावी, तसेच राखेचे (पोटॅश) खत व्हावे. जर ही भाजणावळ रोहिणी नक्षत्रात केली म्हणजे पावसापूर्वी पंधरा दिवस तरच याचा उपयोग होतो.
ग्रामीण भागात शेतजमीन, माळरान, पडीक जमीन, मालकी जंगले असतात. गावाभोवती बऱ्याच ठिकाणी देवराई होत्या, ज्या जैवविविधता टिकवून ठेवत. तसेच या सर्वामुळे गावांना पाणी, जळण, औषधे, चारा इ.चा पुरवठा होत असे. परंतु वाढत्या शहरीकरणाच्या वेगाने माळ व शेतजमिनींमध्ये सेकंड होम, कॉम्प्लेक्स, फार्म हाऊस तयार होत आहेत. शेती कमी कमी होत आहे. नवनव्या बोअरवेल्समुळे भूगर्भातील भूजल पातळी कमी होत आहे. माळावरचे गवत गुरांसाठी, त्यांचे शेण शेतीसाठी खत तयार करून जमिनीचा पोत व सुपीकता टिकवून ठेवली जायची. गावातसुद्धा विभक्त कुटुंबपद्धतीमुळे जनावरे सांभाळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर सुरू आहे. त्यामुळे जमिनी कडक होऊन सच्छिद्रता गेली आहे. पहिल्याच पावसात त्यामुळे पाणी न मुरता वाहून जाते व लगेच पूर परिस्थिती अनुभवास येते. पहिल्या पावसात येणारा मातीचा सुगंधसुद्धा बंद झाला आहे. पूर्वी मृग नक्षत्रातला पाऊस शेतात मुरून आद्र्रा नक्षत्रात १५ दिवसांनंतर पावसाचे पाणी शेतातून वाहत शेताबाहेर जात असे. आज पहिल्याच पावसात वाहू लागते व बरोबर मातीसुद्धा वाहून जात आहे. त्यामुळे सुपीकता कमी झाली आहे.
शेतात मोठय़ा प्रमाणावर भातशेतीसाठी रासायनिक खतांचा वापर होतो. यात ९५% पर्यंत युरियाचा वापर होतो. या भाताला दिलेल्या नत्रापैकी फक्त २५% ते ३०% नत्र (युरिया) पिकाला मिळते. बाकी नत्र हवेत व पाण्याबरोबर वाहून जाते. हा पाण्यात आलेला नत्र पाण्यात जलपर्णी वाढवतो. पाण्यातील परिसंस्था त्यामुळे जवळजवळ नष्ट होते. हा नत्र पिण्याच्या पाण्यातून शरीरात जातो. शरीरात नत्राचे प्रमाण वाढल्यास आजार होतात. प्रामुख्याने किडनीस्टोन हा आहे. तसेच अतिरिक्त नायट्रोजन रोगप्रतिकारकशक्ती कमी करतो. नत्राबरोबर भातशेतीमध्ये फोरेट (दाणेदार कीटकनाशक) वापरले जाते. त्याच्या वापरामुळे बेडूक, गांडुळासारख्या उपयुक्त सजीवांचा नाश होतो. हे कीटकनाशकाचे अंश पाण्याबरोबर जाऊन विहिरी, नद्या व ओढय़ांत येतात व पिण्याचे पाणी विषयुक्त करतात. निसर्गात ही कीटकनाशके संपविण्यास, कुजविण्यास सूक्ष्म जिवाणू नाहीत. कारण ही कीटकनाशके मानवनिर्मित आहेत. अशा प्रकारे ग्रामीण भाग परिसंस्था आपण प्रदूषित करीत आहोत. आपण खत व कीटकनाशके असलेले अन्न व पाणी प्रदूषित करून आपले आरोग्याचे व पर्यावरणाचे नुकसान करीत आहोत.