कल्याण-डोंबिवली शहरांसह २७ गावांना महापालिका तसेच राज्य औद्योगिक विकास महामंडळातर्फे होणारा पाणीपुरवठा यापुढे शनिवारी व रविवारी बंद ठेवण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. १५ जुलैपर्यंत ही पाणी कपात असणार आहे. यापूर्वी आठवडय़ाच्या आडवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत होता. आता हे नियोजन शनिवारी-रविवारी असे करण्यात आले आहे. पाण्याचा उपसा कमी व्हावा हा उद्देश यामागे असल्याचे सांगितले जाते.
कल्याण-डोंबिवली शहरांसह, २७ गावांना बारवी, आंध्र धरणातून उल्हास नदीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. गेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने धरणांमध्ये मुबलक पाणी साठा नाही. येत्या तीन ते चार महिन्यांत उष्णतामान वाढेल. त्या प्रमाणात पाण्याचे प्रमाणही कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत सामान्यांना पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ठाणे लघुपाटबंधारे मंडळाने उल्हास नदीतून पाणी उचलणाऱ्या एमआयडीसी, महापालिका, नगरपालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या संस्थांना आठवडय़ातून दोन दिवस पाणी कपात करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी कल्याण- डोंबिवलीचा पाणीपुरवठा मंगळवारी व शनिवारी बंद ठेवण्यात येत होता. सोमवारपासून येणारा शनिवारी-रविवारी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. शुक्रवारी रात्री १२ वाजता बंद करण्यात येणारा पाणीपुरवठा रविवारी रात्री १२ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.