जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांची टीका

नदीला आपण आई म्हणतो. तिची पूजा करतो. मात्र इथे वालधुनीची अवस्था मैला वाहून नेणाऱ्या मालगाडीसारखी झाली आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांनी रविवारी सकाळी उल्हासनगर येथे केले. चांदीबाई महाविद्यालयाच्या पुढाकाराने आयोजित वालधुनी परिक्रमेत सहभागी होत त्यांनी नदीपात्राची पाहणी केली.

उल्हासनगर येथील चांदीबाई महाविद्यालयाच्या पुढाकाराने आयोजित वालधुनी परिक्रमेत सहभागी झालेल्या राजेंद्रसिंह यांनी पर्यावरणप्रेमी नागरिकांसोबत वालधुनीच्या पात्राची पाहणी केली. उल्हासनगर रेल्वे स्थानकाबाहेरून वाहणाऱ्या वालधुनीच्या किनाऱ्याने ही पदयात्रा काढण्यात आली. स्थानकाबाहेरील पात्रातून टाकण्यात आलेली मैला वाहून नेणारी वाहिनी दोन्ही बाजूने तुटून सांडपाणी थेट नदीपात्रात जात असल्याचे राजेंद्रसिंह यांनी उपस्थितांच्या निर्दशनास आणून दिले. पात्रात ठिकठिकाणी असे विष सोडले जात असल्याने नदीची ही अवस्था झाली आहे. केवळ नदीचे पाणीच नव्हे तर सारा परिसर त्यामुळे दूषित झाला आहे. काठावरील शहरांचे आरोग्य त्यामुळे धोक्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील पिढीने आरोग्यपूर्ण जीवन जगावे, अशी इच्छा असेल तर आता तातडीने नदी संवर्धन मोहीम हाती घेणे आवश्यक आहे. रहिवाशांनी सामूहिक प्रयत्न केले तर वालधुनी पूर्वीसारखी निर्मळ होऊ शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

प्रक्रिया केलेले औद्योगिक अथवा घरगुती सांडपाणी नदीपात्रात सोडण्याऐवजी त्याचा पुनर्वापर करावा, अशी सूचनाही त्यांनी वालधुनीकाठच्या सर्वच प्राधिकरणांना केली. परिक्रमेनंतर महाविद्यालयात झालेल्या बैठकीत उपस्थित पर्यावरणप्रेमी नागरिकांनी वालधुनी नदीच्या संवर्धनाविषयी काय करता येईल, याविषयी चर्चा केली. नदी परिक्रमा ही केवळ सुरुवात आहे. नदीला पूर्वीचे स्वरूप प्राप्त करून देण्याचे वेळोवेळी असे उपक्रम राबविण्याचा निर्धारही पर्यावरणप्रेमी नागरिकांनी व्यक्त केला.