ऐन दिवाळीत ‘लघुनाटय़गृह’ बंद; बालनाटय़, दिवाळी पहाटचे कार्यक्रम रद्द

छताच्या दुरुस्तीसाठी तब्बल वर्षभर बंद राहिल्यानंतर अवघ्या महिनाभरापूर्वी खुले करण्यात आलेल्या घोडबंदर येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहातील लघुनाटय़गृहात (मिनी थिएटर) पाणीगळती होत आहे. त्यामुळे येत्या एक ऑक्टोबरपासून हे नाटय़गृह बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ऐन दिवाळीच्या हंगामात लघू नाटय़गृह बंद राहणार असल्याने या ठिकाणी नेहमी होणारी बालनाटय़े तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम यांसाठी आता अन्यत्र जागा शोधावी लागणार आहे.

ठाणे महापालिकेने काही वर्षांपूर्वी घोडबंदर भागात डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाची उभारणी केली. या नाटय़गृहाच्या मुख्य रंगमंचाच्या छताचे प्लॅस्टर दीड वर्षांपूर्वी कोसळले होते. त्यानंतर पालिकेने छताच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. हे काम पूर्ण होण्यास दीड वर्ष लागल्याने त्या कालावधीत हे नाटय़गृह बंदच होते. अवघ्या महिनाभरापूर्वी दुरुस्तीनंतर घाणेकर नाटय़गृह पुन्हा प्रेक्षकांसाठी खुले करण्यात आले. मात्र, आता या नाटय़गृहातील लघुनाटय़गृहात गळती सुरू झाली आहे. ही गळती कशामुळे होत आहे, हे अद्याप पालिकेच्या अधिकाऱ्यांना समजलेले नाही. त्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी येत्या एक ऑक्टोबरपासून लघुनाटय़गृह बंद ठेवण्यात येणार आहे.

या संदर्भात महापालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे. लघुनाटय़गृहामध्ये नेमके कुठून पाणी गळती होते आणि कशामुळे होते, हे शोधून त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. याशिवाय, छताची दुरुस्ती, कारपेट, व्यासपीठाची सजावट आणि इतर कामे करण्यात येणार आहेत. या कामांसाठी हा रंगमंच १ ऑक्टोबरपासून बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

लघू नाटय़गृह बंद होण्याचा सर्वाधिक फटका लहान नाटय़रसिकांना बसणार आहे. दिवाळीच्या सुटीत या नाटय़गृहात अनेक बालनाटय़े होतात. याखेरीज या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळाही दिवाळीच्या कालावधीत घेण्यात येत असतात. परंतु, ऐन दिवाळीच्या काळात नाटय़गृह बंद राहणार  आहे. डॉ. काशीनाथ घाणेकर नाटय़गृहाच्या मुख्य रंगमंचमध्ये १२०० तर छोटय़ा रंगमंचमध्ये दोनशेची आसनक्षमता आहे. अनेकांना छोटय़ा रंगमंच आर्थिकदृष्टय़ा सोयीस्कर वाटत असल्यामुळे ते त्याला पसंती देतात. या रंगमंचाच्या भाडय़ापोटी वर्षांला ७५ लाखांचे उत्पन्न पालिकेला मिळते. त्यामुळे दुरुस्तीच्या कामामुळे आता महापालिकेला लाखो रुपयांच्या उत्पन्नाला मुकावे लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.