बदलापूरजवळील भोज धरणालगत असलेल्या धनगरवाडीतील रहिवाशांचीही सध्या पाण्यासाठी दाहीदिशा अशी परिस्थिती आहे. एक हंडाभर पाण्यासाठी येथील महिलांना भर उन्हात पाच किलोमीटर अंतर चालून जावे लागते. बेंडशीळ गावालगत असलेल्या एकमेव कूपनलिकेला सध्या पाणी असून परिसरातील तीन ते चार पाडय़ांमधील महिला सध्या तासन्तास पाण्यासाठी येथे ताटकळत असलेल्या दिसतात. परिणामी या कूपनलिकेतील पाणीसाठाही आता कमी झाला आहे. यंदा पावसाचे आगमन वेळापत्रकानुसार होईल, असे गृहीत धरले तरी अजून किमान दीड-दोन महिने येथील रहिवाशांना हा त्रास सहन करावा लागणार आहे.

भोज धरणालगत ताडवाडी आणि धामणवाडी अशा दोन आदिवासी वस्त्या आहेत. तेथील रहिवाशांसाठी शासनाने राबवलेल्या पाणीयोजना अत्यंत नित्कृष्ट दर्जाच्या असल्याने त्याचा त्यांना कधीच लाभ झालेला नाही. त्यामुळे अशा प्रकारची शासकीय अनास्था आणि भ्रष्टाचारामुळे येथील आदिवासींच्या नशिबी जवळ धरण असूनही भीषण पाणीटंचाई आली आहे. घरात जास्त माणसे असलेल्या कुटुंबातील महिलांचे एका खेपेत भागत नाही. त्यामुळे त्यांना पाण्यासाठी दोन किंवा तीन फेऱ्या माराव्या लागतात. त्यामुळे किमान पाऊस पडेपर्यंत या वस्तीवर तातडीने टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी येथील रहिवाशांची मागणी आहे.

भोज धरणातून परिसरातील आदिवासी पाडय़ांना पाणीपुरवठा योजना राबवता याव्यात, म्हणून आम्ही आमच्या खासगी जागा दिल्या आहेत. मात्र योजनांची कामे नीट न झाल्याने मुबलक पाणी असूनही येथील स्थानिक आदिवासी तहानलेलेच राहिले. योजनेअंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाक्या गळतात. पंप नादुरुस्त आहेत. अशा प्रकारे केवळ शासकीय अनास्था आणि भ्रष्टाचारामुळे आदिवासींची परवड सुरू आहे.

आशीष गोळे, विश्वस्त, काका गोळे फाऊंडेशन, बदलापूर