अंत्यविधीसाठी पाणी, निवाराशेडची सोय नाही

एकेकाळी हिरवाईने नटलेली भाईंदर पश्चिम येथील स्मशानभूमी सध्या मरणयातना सोसत आहे. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना विधीसाठी पाणीही मिळत नाही, तसचे निवाराशेड नसल्याने त्यांना उन्हातच उभे राहवे लागत आहे. स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम सध्या महापालिकेने हाती घेतले आहे. या नूतनीकरणाच्या कामावर स्थानिकांनी आणि काही सामाजिक संघटनानांनी आक्षेप घेतले होते. परंतु त्यांना विश्वासात न घेताच महापालिकेने काम सुरू ठेवल्याने मोठय़ा प्रमाणावर नाराजी पसरली आहे.
भाईंदर पश्चिमेकडील स्मशानभूमी एक आदर्श स्मशानभूमी म्हणून ओळखली जायची. अंत्यसंस्कारासाठी आलेल्यांना बसण्यासाठी उत्तम निवाऱ्याची सोय, अंत्याविधीसाठी पाणी अशा अनेक सुविधा या स्मशानभूमीत उपलब्ध होत्या. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते मीलन म्हात्रे यांनीही या स्मशानाची देखभाल नीट व्हावी यासाठी सातत्याने प्रयत्न केले.
सध्या या स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. परंतु नूतनीकरणाचे आराखडे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याने स्थानिक ग्रामस्थ अनेक सामाजिक संघटनांनी त्यावर जोरदार आक्षेप घेतले. लोकांच्या भावना लक्षात घेऊन महापौर गीता जैन व आमदार नरेंद्र मेहता यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष पहाणी केली. यावेळी आराखडे चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे मान्य करण्यात आले. सुधारित आराखडे तयार करून आणि ग्रामस्थांना विश्वासात घेतल्यानंतरच नूतनीकरणाचे काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले. परंतु त्यानंतर एकदाही यासंदर्भात बैठक घेण्यात आली नाही अथवा सुधारित आराखडे दाखविण्यात आले नाहीत.

स्मशानभूमीची दुरवस्था
* निवाराशेड नसल्याने अंत्यसंस्कारासाठी भर तळपत्या उन्हाच्या झळा सोसत नागरिकांना उभे राहावे लागते. अंत्यसंस्कारावेळी अनेकदा मरण पावलेल्या व्यक्तीबाबत शोक व्यक्त करण्यासाठी शोकसभा घेतली जाते. ही सभा घेण्यासाठीदेखील उन्हातच उभे राहावे लागत आहे.
* अंत्यविधीसाठी लागणारे पाणीही अनेक वेळा मिळत नाही. आसपासच्या झोपडय़ांमधून पाणी मागून आणावे लागते.
* नूतनीकरणाच्या कामात लाकडासाठी बांधण्यात आलेले गोदामही तोडण्यात आले असल्याने सध्या लाकडे उघडय़ावरच टाकण्यात आली आहेत. यापैकी अर्धी लाकडे दफनभूमीच्या जागेवर ठेवण्यात आली असल्याने एखादा मृतदेह दफन करण्यासाठी आला तर त्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही.
* लाकडे उघडय़ावर ठेवण्यात आल्याने पावसाळय़ात ती भिजण्याची शक्यता आहे.

ग्रामस्थांना विश्वासात न घेता नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असेल तर ते योग्य नाही. स्मशानातील असुविधेबाबतही बऱ्याच तक्रारी आल्या असल्याने यासंदर्भात अधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याचे सांगण्यात येईल
गीता जैन, महापौर.

स्थानिकांना अशा प्रकारे अंधारात ठेवून नूतनीकरण करणे चुकीचे असून या कामासंदर्भात सर्वाना विश्वासात घेऊन कामाची माहिती देण्यात यावी.
ओमप्रकाश अगरवाल, व्यवस्थापक,
हिंदू वैकुंठभूमी सामग्री भंडार.