गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्याने ठाणे जिल्ह्य़ातील शहरी विभागात फारशी पाणीटंचाई जाणवत नसली तरी ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी पाडय़ांवरील रहिवाशांना पाण्यासाठी कित्येक किलोमीटर वणवण फिरावे लागत आहे. पाण्यासाठी श्रीमंत अशी ख्याती असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील आदिवासी पाडय़ांवरही सध्या भीषण पाणीटंचाई आहे. बदलापूरजवळील भोज धरणाजवळील आदिवासी पाडय़ांमधील रहिवाशांना पाण्यासाठी पाच किलोमीटरचा पल्ला गाठावा लागतोय, तर श्रीमलंग पट्टय़ात वालधुनी नदीच्या प्रवाहालगत असणाऱ्या आदिवासी पाडय़ातील रहिवाशांवर कोरडय़ा प्रवाहात खड्डे खोदून त्यात साचणारे पाणी पिण्याची वेळ आली आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून दीड महिने अवकाश असून आतापासूनच जलटंचाई सुरू झाली आहे.

त्यांच्या नशिबी वालधुनीच्या कोरडय़ा पात्रातील पाझर

अंबरनाथ शहराच्या वेशीवर श्रीमलंग डोंगरपट्टय़ात असणाऱ्या बोहोणोली गावात सध्या भीषण पाणीटंचाई आहे. या गावाच्या बाहेर धनगरवाडी येथे ठाकूर जातीच्या आदिवासींची वस्ती आहे. जवळपास ७० कुटुंबे येथे राहतात. वालधुनीच्या प्रवाहालगत धनगरवाडीच्या पाणीपुरवठय़ासाठी खोदण्यात आलेल्या दोन्ही विहिरी गेल्या महिन्यापासून आटल्या. त्यामुळे दोन किलोमीटर अंतरावर वालधुनीच्या कोरडय़ा पात्रात खड्डा खोदून त्यात साचणारे पाणी पिण्याची वेळ येथील आदिवासींवर आली आहे. अर्थातच संपूर्ण वस्तीला हे पाणी पुरत नाही. त्यामुळे गावातील लोक वर्गणी काढून टँकर मागवतात. दोन-चार भांडी पाण्यासाठी ३० ते ५० रुपये मोजावे लागत असल्याची माहिती धनगरवाडीतील महिलांनी दिली.

हातावर पोट असणाऱ्या कुटुंबांना पाण्यासाठी दररोज इतका पैसा खर्च करणे परवडत नाही. त्यामुळे खड्डय़ातील अशुद्ध पाणी पिण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय नसल्याचे गावातील पद्मा लचके, वंदना गांगड, चंद्रा दरोडा, नागुबाई पारधी आदी महिलांनी सांगितले. सध्या त्यांचा सारा वेळ केवळ पाणी भरण्यात जात आहे. पुन्हा इतका खटाटोप करून मिळणारे पाणी शुद्ध असेलच, याची शाश्वती नाही. त्यामुळे गावातील रहिवासी विविध आजाराने ग्रस्त आहेत. शासनाने पाडय़ासाठी तातडीने एखादी कूपनलिका खोदावी किंवा पाऊस पडेपर्यंत दररोज टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी तुळशी पारधी, बारकू उघडे, संतोष भगत, सुकऱ्या वाघ तसेच या भागात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते सुधाकर झोरे यांनी केली आहे.

अलीकडेच जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांनी धनगरवाडी परिसराची पाहणी केली. त्या वेळी त्यांनी येथे शिरपूर पॅटर्नचा बंधारा घातल्यास येथील आदिवासींचा प्रश्न सुटू शकेल, असे मत व्यक्त केले होते. या धनगरवाडीलगत असलेल्या आनंदनगर औद्योगिक वसाहतीत अनेक मोठमोठय़ा कंपन्या आहेत. त्यापैकी एखाद्या कंपनीने सामाजिक भावनेतून बंधाऱ्यासाठी निधी उपलब्ध करून दिल्यास येथील रहिवाशांचा पाणीप्रश्न सुटू शकेल, असे मत भगिनी मंडळ शाळेच्या सचिव डॉ. पूर्वा अष्टपुत्रे यांनी व्यक्त केले.