जलसंपदामंत्र्यांच्या आदेशानंतरही एमआयडीसीकडून अंमलबजावणी नाही

डोंबिवलीलगत असलेल्या २७ गावांसह दिवा परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन या भागांना बारवीतून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा, असे आदेश जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले असले तरी हा आदेश अद्याप स्थानिक यंत्रणांपर्यंत ‘झिरपला’ नसल्याने २७ गावांची जलप्रतीक्षा कायम आहे. जलसंपदामंत्र्यांच्या आदेशाचे पत्र प्राप्त झाले असले तरी अतिरिक्त पाणीपुरवठा कधीपासून सुरू करायचा यासंबंधीचे ठोस आदेश एमआयडीसीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेले नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेले दिवा शहर आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेतील २७ गावांमध्ये बारा महिने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. येथील बहुतांश भागात टॅकरद्वारे पाण्याचा पुरवठा होत असतो. येथील पाण्याची वाढती समस्या लक्षात घेता पालकमंत्री एकनाथ िशदे यांनी काही दिवसांपूर्वी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. मंगळवारी यासंबंधी घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत महाजन यांनी २७ गावांना अतिरिक्त २५ दशलक्ष लिटर व दिवा शहराला १० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले. आदेश तर दिले गेले; मात्र त्याची अंमलबजावणी कधी होणार याविषयी प्रशासकीय यंत्रणेत संभ्रम दिसू लागला आहे.

मंगळवारच्या बैठकीनंतर वाढीव पाणीपुरवठय़ासंबंधी महाजन यांच्या आदेशाची प्रत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना प्राप्त झाली आहे. यासंबंधीचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला जाणार असून त्यानंतरच बारवी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात ही प्रक्रिया सुरू केली जाणार असली तरी वाढीव पाणी नेमके कधीपासून मिळू शकेल याविषयी ठोस माहिती दिली जात नसल्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रम आहे.

‘यापूर्वीही अशाच स्वरूपाच्या घोषणा आणि आदेश दिले गेले आहेत. प्रत्यक्षात वाढीव पाणी मिळणार का,’ असा सवाल २७ गावांमधील रहिवाशी चंद्रकांत भोईर यांनी उपस्थित केला.‘ दिवा आणि २७ गावांतील पाण्याची मागणी पाहता या भागांचा महापालिकेने अभ्यास करावा तसेच येथील अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करून सर्वाना समान पाणीवाटप करावे. महापालिकेत समाविष्ट असूनही आम्हाला महापालिकेची काहीच सुविधा मिळत नाही,’ असे संगीता बाबर यांनी सांगितले. ‘दिवा आणि २७ गावांत मोठय़ा प्रमाणात अनधिकृत बांधकामे झाली आहेत, त्यांना पाणीपुरवठा सुरळीत होतो. मात्र इतर स्थानिकांना, पाण्याचा कर भरणाऱ्यांना तो होत नाही. नुसते अतिरिक्त पाणी नको, तर पाणी चोरांवरही कठोर कारवाई व्हावी,’अशी अपेक्षा स्वप्नाली माळी यांनी व्यक्त केली.

गुरुवारी आम्हाला २७ गावे व दिवा शहराला बारवी धरणातून अतिरिक्त पाणीपुरवठा करण्यात यावा याविषयीचे आदेश काढण्यात आल्याचे पत्र प्राप्त झाले आहे. यानुसार आम्ही वरिष्ठांना पत्रव्यवहार करणार आहोत. त्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल व पाणीपुरवठा केला जाईल. यामध्ये किती दिवसांचा कालावधी लागेल हे आत्ताच सांगू शकत नाही.

संजय ननवरे, कार्यकारी अभियंता एमआयडीसी.