पालिकेच्या योजनेतून टप्प्यांमध्ये पाणी पुरवठा
ठाणे शहराला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा मंगळवार १९ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजल्यापासून गुरुवार २१ एप्रिल सकाळी ९ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या वेळात महापालिकेच्या स्वत:च्या पाणीपुरवठा योजनेतून ठाणे शहराला टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
त्यामध्ये मंगळवारी सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत शहरातील समतानगर, श्रीनगर, इंदिरानगर, गांधीनगर, ऋतुपार्क, जेल, साकेत, उथळसर, जॉन्सन, इटर्निटी या परिसरात पाणीपुरवठा सुरू राहील. तर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाउंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, ओवळा, रेतीबंदर, मुंब्रा कोळीवाडा, बॉम्बे कॉलनी, शैलेशनगर, संजयनगर व कळव्याचा काही भाग या परिसराचा पाणीपुरवठा सुरू राहील. बुधवार २० एप्रिल रोजी सकाळी ९ ते गुरुवार २१ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेपर्यंत (२४ तास) शहराचा पुरवठा पूर्ण बंद राहणार आहे.

एमआयडीसीचे पाणी ६० तास बंद
महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा बुधवार २० एप्रिल सायंकाळी ६ ते शनिवार २३ एप्रिल सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत कळव्याचा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शिळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रूपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्र. १ या परिसराचा पाणीपुरवठा ६० तास पूर्ण बंद राहणार आहे. या पाणी बंदमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.