ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध भागात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी अचानक फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. गुरुवारी संध्याकाळी जुपिटर हॉस्पिटल परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे परिसरात २० ते २५ फुट उंच पाण्याचे फवारे उडत होते. या घटनेमुळे ठाण्यातील वागले इस्टेट, मनीषानगर आणि घोडबंदर रोड येथील पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार आहे. जलवाहिनीचा पाणी पुरवठा खंडीत करुन दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत काम सुरु राहणार आहे.  ठाणे शहरातील विविध भागाला पाणीपुरवठा करणारी ६०० मिली मीटर व्यासाची जलवाहिनी जुपिटर हॉस्पिटल परिसरात फुटली. यामुळे ठाण्याहून घोड्बंदर रोड तसेच नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहतूकीवर परिणाम झाला. या घटनेच्या ठिकाणी बघ्यांनी गर्दी केल्यामुळे वाहतूक कोंडीमध्ये अधिक वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही.