गझलसम्राट सुरेश भट यांच्या स्मृतिदिनानिमित्त गझलांकित प्रस्तुत मराठी गझल आणि मुशायऱ्याचे आयोजन १५ मार्चला सायंकाळी ५ वाजता सहयोग मंदिर, पहिला मजला, घंटाळी, ठाणे (प.) येथे करण्यात आले आहे. या वेळी सनदी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या अध्यक्षतेखाली गझल मुशायरा संपन्न होणार असून त्याचे निवेदन गझलकार जनार्दन म्हात्रे करणार आहेत; तर गझल मैफिलीत संगीत आणि गायन आदित्य फडके करणार असून निवेदन शिल्पा देशपांडे करणार आहेत. या गझल मुशायरा व मैफिलीला मुंबई व ठाणे पट्टय़ातील तरुण गझलकार उपस्थिती लावणार आहेत; तर ज्येष्ठ गझलकार राम पंडित, ए. के. शेख, गझलगंधर्व सुधाकर कदम, शाहीर सुरेशकुमार वैराळकर आदी गझल क्षेत्रातले नावाजलेले मान्यवर उपस्थित राहणार आहेत. गझल मैफल व मुशायरा या दोन्हींचा एकाच वेळी लाभ मिळाल्याने ठाणेकरांना रविवारी विशेष मेजवानी मिळणार आहे.

साल्सा नृत्यधारा
युवा पिढाचा नृत्याबद्दलचा उत्साह पाहता, आता ठाण्यामध्ये विविध पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. पाश्चात्य देशातील कपडे, गाडय़ा, खाद्य-पदार्थ आदींचा आपण कायमच आपल्या रोजच्या आयुष्यात वापर करत आसतो. परंतु आता ठाणेकरांच्या आठवडय़ाची रंगत वाढवण्याकरिता येथील उथळसर परिसरातील युनायटेड-२१ या तारांकित हॉटेलमध्ये शुक्रवारी ‘सालसा नाइट’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘साल्सा’ हा लॅटिन अमेरिकन नृत्यप्रकार गेल्या काही वर्षांपासून भारतात चांगलाच लोकप्रिय होतो आहे. फिटनेस राखण्यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या नृत्यप्रकारात याचा मोठा प्रमाणावर उपयोग केला जातो. असे असताना शुक्रवारी रात्री ठाण्यात ‘सालसा नाइट’ आयोजित करून युनायटेड-२१च्या व्यवस्थापनाने तरुणाईला आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

पाडव्यासाठी पुरणपोळी, बासुंदीचा बेत
पुढील आठवडय़ातील गुढीपाडव्याच्या पाश्र्वभूमीवर सध्या सर्वत्र हिंदू नववर्ष स्वागतासाठी मोठय़ा उत्साहात तयारी सुरू झाली आहे. सण साजरे करण्यामध्ये चंगळ असते ती खाण्याची. गुढीपाडव्यासाठी खास वैविध्यपूर्ण असा मसालेभात व आंबेडाळ, गोड पदार्थामध्ये सर्वाच्या मनावर राज्य करणाऱ्या ‘त्या दोघी’ म्हणजेच ‘बासुंदी’ आणि ‘पुरणपोळी’ हे सर्व जिभेला पाणी आणणारे पदार्थ बनवण्याची कार्यशाळा कोरम मॉल व्यवस्थापनाने आयोजित केली आहे. बुधवार, १८ मार्च रोजी दुपारी ३ ते रात्री ८ या वेळेत कोरम मॉल, मंगल पांडे रोड, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे (प.) येथे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

हस्तकला आणि हातमाग प्रदर्शन
स्त्री असो वा पुरुष खरेदी करणे हा सगळ्यांच्याच आवडीचा विषय आहे. ठाण्यातील गावदेवी येथील आर्य क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये भव्य हस्तकला आणि हातमागेच्या वस्तुंचे प्रदर्शन सुरु आहे. यामध्ये शाली, साडय़ा, चादरी, कुशन कव्हर आदी हातमागाच्या वस्तु या प्रदर्शनात पहायला मिळणार आहे. फोटो फ्रेम, कुंडय़ा, वॉलपीस, विविध आकाराच्या मुर्त्यां, महिलांसाठी खास दागिने कपडे, प्रसाधनांची लयलटु येथे पाहयला मिळणार आहे. हे प्रदर्शन येत्या २३ मार्च पर्यंत सकाळी ११ ते ८ यावेळेत सुरु राहणार आहे.

बासरी, सितारची सुमधूर जुगलबंदी
रसिकोत्सवातर्फे होळी सणानिमित्त सुमधुर जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भसार दास हे बासुरी, तर रोहन दास गुप्ता हे सितार आणि तबल्यावर त्यांची साथ देण्यासाठी डेनिस कुचेराव व संदीप घोष यावेळी त्यांच्या कलेचे सादरीकरण करणार आहेत. शुक्रवार, १३ मार्च रोजी रात्री ८ ते १०.३० यावेळेत काशीनाथ घाणेकर, हिरानंदानी मेडोज, ठाणे(प) येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सुट्टीमधील निसर्गभ्रमंती
येत्या सुट्टीमध्ये पुस्तकातील चिऊ आणि काऊ पक्ष्यांव्यतिरिक्त काही पक्षी आपण आपल्या मुलांना दाखवू शकतो. पर्यावरण दक्षता मंचतर्फे रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ७ वाजता गंधारी, आधारवाडी, कल्याण येथे ‘पक्षिनिरीक्षण’ या विषयावर निसर्गभ्रमंती आयोजित करण्यात आली आहे. या उपक्रमात सहभाग घेण्यासाठी संपर्क-९८६९०३३५८३.

‘रे सख्या’  गीत मैफल’
स्वरदा क्रिएशन्स निर्मित व ओमकार कलामंडळाच्या वतीने रविवार, १५ मार्च रोजी सर्वेश सभागृह, दुसरा मजला, टिळक रोड, डोंबिवली (पू.) येथे सायंकाळी ६ वाजता ‘रे सख्या’ ही गीत मैफल आयोजित करण्यात आली आहे. गायक व संगीतकार केतन पटवर्धन हे पंधरा गीतकारांची विविध गाणी एकाच मंचावर सादर करणार आहेत.

४० कलावंतांचा एक सूर, एक ताल!
ठाण्यातील संगीत कलावंतांना एकत्र आणून त्यांच्या कलेचा आस्वाद ठाणेकर रसिकांना देण्यासाठी ठाणे म्युझिक फोरमच्या वतीने ‘युनिटी २०१५’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. १३ ते १५ मार्चदरम्यान सहयोग मंदिर सभागृहात सायंकाळी ५.३० ते १० या वेळात हे संमेलन रंगणार आहे. ठाण्यातील चाळीसहून अधिक कलावंत या कार्यक्रमात आपली कला सादर करणार आहे. ठाण्यातील कलाकारांना एकाच व्यासपीठावरून आपली कला सादर करण्याची संधी ठाणे म्युझिक फोरमने ठाण्यातील नवोदित आणि नामांकित कलाकारांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यंदा या कार्यक्रमाचे तिसरे वर्ष असून त्यामध्ये ४० हून अधिक कलाकार गायक, वादक मिळून कला आविष्कार सादर करणार आहेत. शुक्रवार, १३ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘ना डारो रंग’ या होळी संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. विभावरी बांधवकर, कल्याणी साळुंके, हेमा उपासनी, स्वरांगी मराठे, रोहित धारप, दीपिका भिडे, निषाद बाक्रे, अपूर्वा गोखले, मंदार वाळुंजकर, पूजा बाक्रे, प्रदीप चिटणीस, किशोर पांडे, पुष्कर जोशी, सुप्रिया जोशी, अनंत जोशी, उत्पल दत्त कार्यक्रम सादर करणार आहेत; तर वासंती वर्तक कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी शनिवार, १४ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजता ‘खरा तो प्रेमा’ हा नाटय़संगीतावर आधारित कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. वेदश्री ओक, श्रीया सोंडूर, वरदा गोडबोले, नूपुर काशीद, प्राजक्ता जोशी, हर्षां भावे, शेखर राजे, मोहन पेंडसे, आदित्य ओक, आदित्य पानवलकर, केवल कावले, प्रकाश चिटणीस हे कलाकार सहभागी असून मुकुंद मराठे निवेदन करणार आहेत. रविवार, १५ मार्च रोजी रात्री ९.३० वाजता ‘रंगला अभंग’ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर होणार आहे. मुकुंद मराठे, योगेश देशमुख, संजय मराठे, रघुनाथ फडके, प्राजक्ता मराठे, श्रीपती हेगडे, मुकुंदराज देव, उत्तरा चौसाळकर, विवेक सोनार, भाग्येश मराठे, कृतिका पर्वतीकर, रोहित देव, सुमंत बिवलकर, शिरीष पाटणकर, डॉ. दिलीप गायतोंडे, अथर्व कुलकर्णी कार्यक्रम सादर करणार आहेत, तर धनश्री लेले कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत.

काय, कुठे, कसं?
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे
*ही पोस्ट विभागाची एक महत्त्वपूर्ण योजना आहे. याला राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रे किंवा एनएससी असेही म्हणतात.
*या योजनेत दरमहा किमान १०० रुपयांची गुंतवणूक करता येते, मात्र कमाल गुंतवणुकीस कोणतीही मर्यादा नाही.
*या योजनेमध्ये योजनाधारकाला वार्षिक साडेआठ टक्के व्याज मिळते. दर सहा महिन्यांनी व्याज चक्रवाढ पद्धतीने मोजले जाते.
*पाच वर्षांच्या कमाल मुदतीनंतर मुद्दल व व्याज गुंतवणूकदाराला मिळते. मात्र मुदतीपूर्वी हे प्रमाणपत्र मोडता येत नाही.
*महत्त्वाचे म्हणजे या योजनेत योजनाधारकाला प्राप्तिकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत करसवलत मिळते. ही सवलत लक्षात घेता प्रत्यक्ष व्याजदर अधिक उच्च ठरू शकतो.
कुठे मिळणार?
*जवळच्या पोस्टाच्या कार्यालयात संपर्क साधून या योजनेविषयी अधिक माहिती मिळविता येईल.
* http://www.indiapost.gov.in  या संकेतस्थळावरही आपण संपर्क साधू शकता.

मुंबई साप्ताहिकी : ..आता तरी येशील का?’
दयाघना, सखी मंद झाल्या तारका, सांज ये गोकुळी यांसारख्या आशयगर्भ रचनांची निर्मिती करणारे कवी-गीतकार सुधीर मोघे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त ‘..आता तरी येशील का’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. आर्च एन्टरप्रायझेस आयोजित आणि मेलोडियस मोमेंट्सची प्रस्तुती असलेला हा कार्यक्रम बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात रविवार, १५ मार्च या दिवशी दुपारी ४ वाजता होणार आहे. या कार्यक्रमात मंदार आपटे व अर्चना गोरे गाणी सादर करणार असून प्रसिद्ध अभिनेत्री समीरा गुजर-जोशी रसिकांशी संवाद साधणार आहेत. मधुरा वेलणकर, सुमित राघवन व चिन्मयी सुमित या कलाकारांचाही या कार्यक्रमात विशेष सहभाग आहे. संपर्क- विनीत गोरे ९८२०८४०४१३.
‘फ्रॅग्रन्स ऑफ लाइफ’
नवी मुंबईतील सेक्टर १५, सीबीडी, बेलापूर येथे शौर्य कला दालन नुकतेच सुरू झाले आहे. या नवीन कला दालनात शिरीष मिठबावकर यांच्या चित्रांचे ‘फ्रॅग्रन्स ऑफ लाइफ’ हे प्रदर्शन सध्या भरविण्यात आले आहे. मिठबावकर यांची ४०-४२ वेगवेगळ्या विषयांवरील चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली असून त्यामध्ये अमूर्त शैलीतील चित्रेही पाहायला मिळतील. हे प्रदर्शन ३१ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत खुले राहील.

‘वॉटर ट्रेल्स’
जलरंगातील चित्रे हे विक्रांत शितोळे यांचे वैशिष्टय़ असून जलरंगातील विविध प्रसिद्ध इमारती, झोपडय़ा, मशीद, देवळे, छत्रपती शिवाजी टर्मिनसबाहेरील दृश्य अशी अनेक चित्रे ‘वॉटर ट्रेल्स’ या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत. वास्तूचे अस्तित्व आणि संवेदना यांचा अनुभव घेऊन ती अनुभूती चित्रांमध्ये उतरविण्याचा विक्रांत शितोळे यांनी प्रयत्न केला आहे. राजस्थान, बनारस, कर्नाटक, महाराष्ट्र अशा ठिकठिकाणी जाऊन चित्रित केलेल्या कलाकृती या प्रदर्शनात पाहायला मिळतील. हे प्रदर्शन वरळीच्या नेहरू सेंटर कला दालनात १६ मार्चपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पाहायला मिळेल.

‘वुमन, दाऊ ए मिस्टरी’  
स्त्रीची विविध रूपं हा विषय हाताळल्यानंतर चित्रकार विशाल साबळे यांनी ‘वुमन, दाऊ ए मिस्टरी’ या प्रदर्शनातील चित्रांमधून स्त्रीच्या आंतरिक शक्तीचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न केला आहे. निसर्गाने स्त्रीला दिलेले सौंदर्य, शक्ती, ऊर्जा याचे प्रकटीकरण विविध रंगांचा वापर करून विविध चित्रांतून मांडण्याचा प्रयत्न चित्रांतून केला आहे. हे प्रदर्शन १८ मार्चपर्यंत जहांगीर कला दालनात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत खुले राहील.

रविवारी ‘प्रात:स्वर’
पंचम निषाद या संस्थेतर्फे नियमितपणे प्रात:स्वर या मैफलीद्वारे संगीत क्षेत्रातील उदयोन्मुख गायक-गायिका तसेच वादकांना आमंत्रित करून सकाळची मैफल आयोजित केली जाते. प्रभादेवी येथील रवींद्र नाटय़ मंदिर संकुलाच्या खुल्या प्रांगणात सकाळच्या वेळी सकाळचे राग ऐकण्याचा अनुभव मुंबईकर संगीतप्रेमींना घेता येतो. यंदाची ‘प्रात:स्वर’ मैफल रविवार, १५ मार्च रोजी सकाळी ६.३० वाजता होणार असून तरुण गायिका पं. अजय चक्रवर्ती यांच्या शिष्या सुचिस्मिता दास यांचे गायन ऐकायला मिळणार आहे. संदीप घोष (तबला), दिलशाद खान (सारंगी), अजय जोगळेकर (हार्मोनियम) हे कलावंत साथसंगत करणार आहेत. या संगीत मैफलीला सर्व रसिकांना खुला प्रवेश दिला जातो.

मधु लिमये स्मृती व्याख्यान
उत्कृष्ट संसदपटू म्हणून देशात ओळख असलेले दिवंगत समाजवादी नेते मधु लिमये यांच्या स्मृतीनिमित्त दरवर्षी केशव गोरे स्मारक ट्रस्टच्या वतीने ‘मधु लिमये स्मृती व्याख्यान’ आयोजित केले जाते. बुधवार, १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता रचना संसद सभागृह, प्रभादेवी येथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून नयी दुनिया या उर्दू वृत्तपत्राचे संपादक शाहीद सिद्दीकी इस्लाम व हिंदू धर्मात गेल्या एक हजार वर्षांत कसा परस्पर संयोग घडत गेला, यावर व्याख्यान देणार आहेत.

‘हेवन ऑफ नेचर’
दिवंगत चित्रकार कोल्हापूरचे एस. ए. एम. काझी यांच्या निसर्गचित्रांचे प्रदर्शन ‘हेवन ऑफ नेचर’ सध्या नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडण्टमधील आर्ट वॉक कला दालनात भरविण्यात आले आहे. भारताचा स्वर्ग मानले जाणारे काश्मीर, हिमाचल प्रदेशमधील नेत्रसुखद निसर्ग, सूर्यास्त, सूर्योदयाचे नयनरम्य देखावे अशी अनेक चित्रे या प्रदर्शनात पाहायला मिळतील. १५ मार्चपर्यंत सकाळी ९ ते रात्री ९ या वेळेत हे प्रदर्शन खुले राहील.