ठाणे शहरातील विविध भागांमधील रस्त्यांवर ठाण मांडत वाहतुकीची कोंडी करणाऱ्या आठवडी बाजारांच्या मुसक्या आवळण्याची महापालिका प्रशासनाची घोषणा आठवडाभरातच फुसका बार ठरण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वागळे इस्टेट परिसरातील इंदिरानगर भागातील रस्ते अडवून मंगळवारचा बाजार बिनधोकपणे सुरू असून आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या आदेशाला अतिक्रमण विभागाचे अधिकारी वाकुल्या दाखवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, शहरात एकही आठवडी बाजार भरू दिला जाणार नाही, अशी घोषणा खुद्द जयस्वाल यांनीच केली होती.ठाणे शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसत असतानाच शहरातील वेगवेगळ्या भागात भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. या बाजारातील गर्दीचा फायदा घेऊन खिसे कापणाऱ्या भुरटय़ा चोरांचे प्रमाणही वाढले होते. या पाश्र्वभूमीवर ठाण्यातील राजकीय नेत्यांनीही आठवडा बाजार बंद करण्याची मागणी लावून धरली होती. नुकत्याच झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांकडून आठवडा बाजारविरोधात तक्रार करण्यात आल्यानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी हे बाजार बंद करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार पंधरा दिवसांपूर्वी पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आठवडा बाजारांविरोधात धडक कारवाई सुरू केली होती. या कारवाईदरम्यान महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर मानपाडा परिसरात जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र, त्यानंतर पालिकेने आपली मोहीम अधिक तीव्र केली. सध्या शहरात एकही आठवडा बाजार भरत नाही, असा दावाही आयुक्तांनी केला होता.मात्र, इंदिरानगर भागातील मंगळवार बाजाराने आयुक्त जयस्वाल यांच्यासह महापालिका प्रशासनाचे दावे फोल ठरवले आहेत. महापालिकेने पंधरा दिवसांपूर्वी केलेल्या कारवाईमध्ये खारेगांव, ढोकाळी, लोकमान्यनगर, कासारवडवली, पातलीपाडा आणि मनोरमानगर येथील वार बाजार बंद करण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. प्रत्यक्षात लोकमान्यनगर येथे गेल्या अनेक महिन्यांपासून बुधवार बाजार भरतच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काही वर्षांपूर्वी स्थानिक नागरिकांनी विरोध करत हा बाजार बंद केला आहे. त्यानंतर इंदिरानगर भागातील रस्त्यावर मंगळवारी हा बाजार भरू लागला आहे.  इंदिरानगर भागातील आठवडा बाजार महापालिकेच्या यादीतच नसल्याचे उघड झाले आहे.

वाहतुकीचे तीनतेरा..
वागळे इस्टेट येथील सावरकरनगर, लोकमान्यनगर, इंदिरानगर, वागळे इस्टेट आदी परिसरांतील नागरिकांना ठाणे स्थानक तसेच शहरातील अन्य भागात जाण्याकरिता वागळे इस्टेट ते नितीन कंपनी हा एकमेव मार्ग आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ सुरू असते. असे असतानाच इंदिरानगरहून कामगार हॉस्पिटलकडे जाणाऱ्या मार्गावर आठवडा बाजार भरत असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडू लागली आहे.