नालासोपारा-वसई दरम्यानच्या धोकादायक खांबामुळे अनेक दुर्घटना

नालासोपारा रेल्वे स्थानक ते वसई रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला लागूनच असलेला जीवघेणा खांब रेल्वे प्रशासनाने हटवला आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

नालासोपारा ते वसई रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड वायरसाठी एक खांब उभारण्यात आला होता. मात्र हा खांब खूपच जवळ असल्याने वर्षभरात आठ निष्पाप प्रवाशांचा या खांबाला धडकून दुर्दैवी मृत्यू झाला, तर कित्येक जखमी झाले आहेत. त्यामुळे या खांबाला धक्का बसून निष्पाप प्रवाशांचे बळी जात असल्याची बाब युवा सेनेचे प्रतीक सुतार आणि रविकांत नागरे यांनी या प्रकरणामध्ये सातत्यपूर्ण पाठपुरावा करून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीनंतर अखेरीस रेल्वे प्रशासनाने याची गंभीरतेने दखल घेत ताबडतोब हा खांब हटवून पर्यायी दुसरा खांब सुरक्षित अंतरावर बसवला आहे.

नालासोपारा आणि विरार या रेल्वे स्थानकातून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. येथून निघणाऱ्या लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी प्रमाणाच्या बाहेर असते. त्यामुळे प्रवाशांना दरवाजावर उभे राहण्याशिवाय पर्याय राहत नाही. मात्र नालासोपारा आणि वसई दरम्यान हा उभारलेला खांब अतिशय जवळ असल्याने डब्यात दरवाज्याबाहेर लटकणारे प्रवासी त्या खांबाला धडकून लोकलमधून खाली पडत होते. मुख्यत: रात्रीच्या वेळी लोकल जलद असली की खांब आल्यावर रात्रीच्या वेळी दिसत नाही. गेल्या काही महिन्यांत खांबामुळे कित्येकांचे जीव गेले असून जखमी झाले आहेत. गेल्या महिन्यांत दोन दिवसांत दोन अपघात झाले होते. त्यामुळे आता हा खांब रेल्वे प्रशासनाने हटवल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.