अपूर्व ओकमराठी भाषेची लोकमान्यता गेलं दशकभर संथ गतीने तरीही अखंड आटत आलेली आहे. शिक्षणासारखं क्षेत्र, की जिथून खऱ्या अर्थाने याचा उगम होतो तिथेही मराठीला इंग्रजी नावाचा गोंडस आणि भुरळ पाडणारा पर्याय आजकाल पर्याय न राहता ती एक मूलभूत निवड झालेली आहे. भरीस भर म्हणून कमी पटसंख्येच्या नावाखाली शासनही मराठी शाळा बंद करू पाहात आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सरस्वती सेकंडरी स्कूल या ठाण्यातल्या नामांकित व महाराष्ट्रातील अग्रेसर शाळेने मराठीसोबत इंग्रजी माध्यम सुरू करण्याचे जाहीर केले.

त्यावर भावी पालकांच्या शंका, प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी शाळेने एक बैठकही घेतली. शाळेचे विश्वस्त अगदी आस्थेने या नव्या इंग्रजी माध्यमाची माहिती आणि महती लोकांना सांगत होते. त्या माध्यमाचे प्रवेश सुरूही झालेत. असं असताना, या दरम्यान ज्यांची अपत्ये आजमितीस सरस्वती सेकंडरी स्कूलमध्ये शिकत आहेत,असे पालक मात्र संभ्रमित अवस्थेत आहेत. आपल्या मुलांच्या भवितव्याची चिंता त्यांना त्रास देते आहे.

पालकांच्या मते खटकणारी मुख्य गोष्ट अशी की, शाळेने या सगळ्या प्रकारात कुठेही पारदर्शकता दाखवली नाही. शाळेने काय करावं हे पालक ठरवू इच्छित नाहीत, पण मुळात शाळेने नवीन काहीतरी सुरू करताना आजी विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांचा विचार काय केला? हे प्रथम स्पष्ट करायला हवं होतं. पालक म्हणून आम्हाला विश्वासात घ्यायला हवे होते अशी भावना पालकांच्या मनात आहे. आमचा इंग्रजी माध्यम सुरू करण्याला विरोध नाही. परंतु असलेल्या मराठी माध्यमाबद्दल भविष्यात शाळेच्या काय योजना आहेत याची आम्हाला आता धास्ती आहे, असा एक सूर लावला जातोय. शिवाय, नवीन शाळा ही सध्या असलेल्या शाळेच्या वास्तूतच सुरू होणार असल्याने सोयीसुविधांच्या वापरातलं प्राधान्यक्रम शाळा कसं ठरवेल? सध्याच्या विद्यार्थ्यांवर अन्याय तर होणार नाही ना? सीबीएसई आणि महाराष्ट्र बोर्ड हे दोन अभ्यासक्रम एकाच शाळेत असल्यावर विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ  नये यासाठी शाळा काय करणार आहे? शाळेला पालकांकडून सहकार्याची अपेक्षा आहे का? मराठीचा पुरस्कार करणाऱ्या शाळेने इंग्रजी माध्यम सुरू केलं. या पाश्र्वभूमीवर ‘मराठी माध्यम बंद होणार नाही’, या विधानाची विश्वासार्हता काय? भविष्यात इंग्रजी माध्यमाची पटसंख्या वाढवण्याकरिता म्हणून मराठी माध्यमाची पटसंख्या मुद्दाम कमी केली जाणार नाही, हे कशावरून? असे अनेक प्रश्न या सर्व पालकांच्या मनात आहेत.

नुकताच वृत्तपत्रात यासंबंधी एक लेख छापून आला होता. ज्यात काही नामांकित मराठी शाळांच्या भूमिका मांडण्यात आल्या होत्या. तो वाचताना असं लक्षात आलं की मराठी शाळेची गुणवत्ता उंचावायचा मनापासून प्रयत्न क्वचितच एखाद्या शाळेकडून होताना दिसतो. उलटपक्षी प्रवाहानुसार वाहण्यालाच मराठी शाळा पसंती जास्त देतात. बालमोहन असो किंवा सरस्वती असो, ‘मराठी माध्यम बंद होणार नाही; पण त्यासोबत इंग्रजीही सुरू होणार’ असं म्हणताना शाळा, पालकांबरोबरच स्वत:चीही फसवणूक करत आहेत का? असा विचार मनात घर करून राहतो. या पालकांशी बोलताना नेमकं हेच जाणवतं.

सरस्वती सेकंडरी स्कूलने गेल्या वर्षभरापासून आपल्या भावी नूतनीकृत इमारतीसाठी देणगी देण्याचं आवाहन आजी, माजी, भावी पालकांना केलेलं आहे. त्यानुसार शाळेबद्दलच्या प्रेमापोटी, आस्थेपोटी आणि आपली मुलं या शाळेत शिकत आहेत किंवा शिकतील या विचारातून अनेक पालकांनी शाळेला यथाशक्ती देणगी दिली. ही देणगी आता फक्त मराठी शाळेसाठीच वापरली जाईल का? की याचा फायदा नव्या इंग्रजी माध्यमालाच होईल? हा मोठा सवाल आहे. आणि तसं न झाल्यास पालकांना ही त्यांची फसवणूक वाटली तर त्यात काही गैर नाही. अशा विचाराच्या पालकांशी संवाद साधताना काही गोष्टी प्रकर्षांने जाणवतात त्या अशा की शाळेच्या विश्वस्तांनी आजी पालकांना विश्वासात घेणे गरजेचे होते.

इंग्रजी माध्यम सुरू करणे हा शाळेचा निर्णय आहे, परंतु असलेल्या मराठी माध्यमाबद्दलचा भविष्यातला विचार अगोदर स्पष्ट करायला हवा होता.आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठी माध्यमात ज्यांनी आपल्या पाल्याला घातले आहे त्यांनी विचारपूर्वक घेतलेला तो निर्णय आहे त्यामुळे मराठी माध्यमाच्या प्रगतीसाठी सर्व प्रकारचं योगदान द्यायची त्यांची तयारी आहे. परंतु शाळांनीच पावलं मागे घेतल्यामुळे त्यांना एकटं पडल्यासारखं वाटत आहे. आणि या एकटेपणातूनच उद्या पालकांचा  एकत्रित आवाज उभा राहिला तर नवल नसावं.