अच्छे दिनाच्या अपेक्षेने रेल्वे अर्थसंकल्पाकडे लक्ष लावून राहिलेल्या रेल्वे प्रवाशांना गुरुवारी निराशेचा सामना करावा लागला. प्रत्येक दिवशी मुंबईकडे कामानिमित्ताने जाण्यासाठी लोकलच्या गर्दीचा सामना कराव्या लागणाऱ्या नोकरदार प्रवाशांना या अर्थसंकल्पाकडून कोणत्याही प्रकारचा दिलासा मिळाला नाही. महाराष्ट्रातील प्रभूंची कृपा मुंबई उपनगरांवर होईल, अशी अपेक्षा असताना मुंबईकडे आणि सर्वाधिक प्रवासी संख्या असलेल्या ठाणेपलीकडच्या स्थानकांकडे या अर्थसंकल्पाने पुरते दुर्लक्ष केले आहे. रेल्वे भाडेवाढ झाली नाही म्हणून एकीकडे समाधान व्यक्त केले जात असताना ठोस योजना आणि सुविधांची घोषणा होत नसल्याने प्रवाशांनी निराशा व्यक्त केली आहे.

मध्य रेल्वेच्या मार्गावर सर्वाधिक अपघात घडणाऱ्या स्थानकांवर वैद्यकीय सुविधा पुरवणे गरजेचे आहे. स्थानक परिसरात वैद्यकीय मदत केंद्र उभारले गेल्यास आणि मदतीसाठी अ‍ॅम्ब्युलन्सची व्यवस्था केल्यास अपघातग्रस्तांना तात्काळ सुविधा मिळू शकते. मात्र वैद्यकीय मदत केंद्राच्या बाबतीत एक साधा उल्लेखसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये नाही. १५ डब्यांच्या मागणीकडेसुद्धा लक्ष दिले नाही. तसेच लोकल सेवेचा खोळंबा टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे एकंदरच निराशादायक हा अर्थसंकल्प आहे.
– सुयश प्रधान, माहिती अधिकार कार्यकर्ते

कोकणातील तरुणांसाठी रोजगार आणि भाडेवाढ टाळल्यानंतर काही प्रवाशांकडून समाधानाची भावना व्यक्त केली जात असली तरी ठाणेपलीकडच्या अनेक मागण्यांपैकी कोणत्याही मागणीला या अर्थसंकल्पात स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे लोकल प्रवाशांच्या पदरी निराशाच आहे. नव्या गाडय़ा आणि स्थानकांबद्दल कोणत्याही प्रकारची मागणी अर्थसंकल्पात मान्य झालेली नाही.
– जितेंद्र विशे, प्रवासी संघटना प्रतिनिधी

कोणत्याही फसव्या घोषणा केलेल्या नसल्याने हा अर्थसंकल्प स्वागतार्ह आहे. दीड हजार फाटक बंद केली जाणार असल्याने मुंबई उपनगरीय रेल्वेचा वेग वाढण्यास मदत होणार आहे. मात्र रखडलेल्या प्रकल्पांना निधीची कोणतीच तरतूद नसल्याने मुंबईकरांचा अपेक्षाभंग झालेला आहे. नवे डबे, नवे रेल्वे रूळ, सीएसटी-कल्याण, कर्जत-पनवेल दुसरा रेल्वे मार्ग तेथील शटल सेवा, ठाणे बोरिवली व्हाया भिवंडी, नाशिक-डहाणू मार्ग अशा कोणत्याच प्रकल्पांना भरीव मदत या अर्थसंकल्पात केलेली नाही. त्यामुळे देशवासींनी स्वागत केले असले तरी ठाणेकरांचा अपेक्षाभंग झालेला आहे.
– नंदकुमार देशमुख, ठाणे

नव्या प्रकल्पांच्या घोषणाबाजींची अपेक्षा प्रभूंकडून नव्हती. तर त्यांच्याकडून जुने प्रकल्प पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होतील, त्यासाठी भरीव तरतूद अर्थसंकल्पात होईल, मुंबई उपनगरांतील स्थानकांच्या विकासकामांसाठी चांगल्या निधीची तरतूद होईल, अशी अपेक्षा होती. मात्र तशा कोणत्याच घोषणा या अर्थसंकल्पात नसल्याने प्रभू पावलेच नाहीत, असे म्हणावेसे वाटते आहे.
– राजेश घनघाव, कल्याण-कसारा प्रवासी संघटना

काय मिळाले..
*ठाणे-विटावा रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी तरतूद
*कळवा-ऐरोली एलिव्हेटेड रोडसाठी ४२८ कोटींची तरतूद
*पनवेल-कर्जत दुहेरी रेल्वेमार्गाची योजना
*अडथळा ठरणारे रेल्वे फाटक बंद करण्याची घोषणा

दिव्याकडे दुर्लक्षच..
महत्त्वाच्या ठरणाऱ्या दिवा स्थानकात सर्वच समस्यांशी झगडा करावा लागत आहे. दिव्यावरून लोकल सोडण्यासाठी येथील स्थानक विकासासाठी निधी हवा होता; मात्र दिव्याकडे दुर्लक्ष झालेले दिसते, अशी प्रतिक्रिया दिवसा प्रवासी संघटनेचे पदाधिकारी आदेश भगत यांनी व्यक्त केली.

सोयीसुविधांसाठी पुन्हा ‘प्रतिक्षा यादी’
यंदा सादर झालेल्या रेल्वे अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ करण्यात आलेली नाही. याशिवाय एकही नवीन गाडीची घोषणा करण्यात आलेली नाही. महाराष्ट्रातील मार्गाच्या दुपदरीकरणाबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने रेल्वेतील अनेक सोयीसुविधांसाठी प्रवाशांना पुन्हा प्रतिक्षाच करावी लागणार आहे.

सीसीटीव्ही गरजेची
यंदा सादर झालेल्या रेल्वे बजेटमध्ये फारशा आश्वासक गोष्टी नसल्याचे मला वाटते. रेल्वेने नुकतेच तिकिटांचे दर वाढविले होते. त्यामुळे या वेळी पुन्हा दरवाढ केली नाही हे उत्तमच आहे. चार महिने आगाऊ तिकीट बुकिंग करता येणार आहे. ते प्रवाशांच्या दृष्टीने चांगले आहे. याशिवाय सुरक्षिततेसोबतच स्वच्छतेकडेही भर दिला असता, तर जास्त आवडले असते.
– संचिता काळे

उदासीन संकल्प
नेहमीप्रमाणे याही वर्षांचे रेल्वे बजेटने महाराष्ट्राच्या फारशा अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत. मुंबईकरांसाठी हे बजेट फोलच ठरले आहे. मुंबईतील रेल्वे ट्रॅकच्या दुपदरीकरणाबाबत रेल्वेमंत्री काही तरी तरतूद करतील अशी अपेक्षा होती पण ती फोल ठरली. सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी काही पावले उचलली आहेत, त्यामुळे आगामी काळात अपघात टळू शकतील ही कौतुकास्पद गोष्ट आहे. याशिवाय जनरल डब्यांमध्ये वाढ, महिला आणि वृद्धांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांनी उचललेली पावले हे या बजेटचे आकर्षण आहे.
– देवाशीष कदम

मुंबईकरांना वगळले
भाडेवाढ केली नाही, हा मुद्दा वगळता मुंबईकरांना काहीच मिळाले नाही. राम नाईकांनंतर सुरेश प्रभूंच्या रूपाने महाराष्ट्राला खूप वर्षांनी रेल्वेमंत्री मिळाला होता. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा होती. खरे तर मुंबईकर  मोठा करदाता आहे,  
   – श्रीकृष्ण वैद्य

संकल्प आश्वासक
जुन्या गाडय़ा आणि प्रकल्प मार्गी लावायचा प्रयत्न यंदा रेल्वेमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे आतापर्यंत अडकलेले प्रकल्प मार्गी लागण्याची आशा आहे. पण स्टेशनला कंपन्यांची नावे देण्याची योजना पटत नाही. तसेच कर्जत-कसारा दरम्यान ट्रॅक वाढवण्याची तरतूद करणे गरजेचे होते. – नितीन जैतापकर

उपयोग भविष्यात ठरेल
यंदाच्या बजेटमध्ये रेल्वेमंत्र्यांनी मूलभूत सोयींवर जास्त भर दिलेला दिसून येतोय. व्हॅक्युम टॉयलेटसारख्या सुविधा नक्कीच कौतुकास्पद आहेत. त्यासोबतच रेल्वेच्या स्वच्छतेवर असून भर देण्याची गरज होती.
    – अनघा माधव डिके