tvlog03भिवंडी शहरातील महिनाभरापूर्वीचा प्रसंग. पिराणीपाडा भागातील एका इमारतीभोवती मोठी गर्दी जमली होती. सर्वाची नजर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर होती. या मजल्यावरील खिडकीतून एक जण खाली डोकावत होता आणि इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी देत होता. चोरीच्या संशयावरून शांतीनगर पोलीसांचे पथक पकडण्यासाठी आल्यामुळे तो अशा स्वरूपाच्या धमक्या देत होता. हा प्रकार पाहून पोलीसही चक्रवले आणि त्यांना काही काळ ‘शोले’ चित्रपटाची आठवण झाली. पण पोलिसांच्या शक्कलपुढे त्यांची शोलेची नक्कल फार काळ टिकू शकली नाही आणि पोलिसांनी आखलेल्या जाळ्यात तो स्वत:हूनच येऊन अडकला..
ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर अशा सर्वच शहरांमध्ये सोनसाखळी चोरटय़ांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यामुळे सर्वच पोलीस ठाण्यांतील पथके अशा टोळ्यांच्या मागावर असतात. सोनसाखळी चोरीत सक्रिय असलेल्या एका चोराची माहिती शांतीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. डी. शिंदे आणि त्यांच्या पथकाने पिराणीपाडा परिसरात धाड टाकली. पण त्यापूर्वीच तो चोरटा तेथून पसार झाला होता. त्यामुळे पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होते. असे असतानाच तो चोरटा पुन्हा पिराणीपाडा भागात आल्याची माहिती पथकाला मिळाली. पहिल्या धाडीत तो पोलिसांच्या तावडीतून निसटला होता, त्यामुळे पुन्हा तो पळून जाऊन नये म्हणून पोलिसांनी व्यूहरचना आखली. पोलीस उपायुक्त सुधीर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. डी. शिंदे आणि त्यांचे पथक पिराणीपाडा परिसरात पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक एस. बी. राठोड, पोलीस हवालदार एस. व्ही. सूर्यवंशी, आर. व्ही. पाटील, पोलीस नाईक एम. पी. चौधरी, एम. आर. पाटील, जे. के. सातपुते, ठाकूर, पोलीस शिपाई डी. डी. कोळी, हरणे, पाटील, कडबे आदींचा पथकात समावेश होता. या पथकाने परिसरात त्या चोरटय़ाचा शोध सुरू केला. त्या वेळी एक तरुण संशयितरीत्या पळून जाताना पथकाच्या निदर्शनास आला. त्यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आणि पथकाने त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांचे पथक पाठीमागे लागल्याचे पाहून त्याने परिसरातील लैला इमारतीत धाव घेतली. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील एका घरामध्ये शिरला आणि त्याने घराला आतून कडी लावून घेतली. त्यापाठोपाठ पोलीस पथक घराबाहेर पोहोचले. त्यांनी त्याला घराचा दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र तो दरवाजा उघडत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी इमारतीला चारही बाजूंनी घेराव घातला. काही वेळानंतर इमारतीभोवती मोठी गर्दी जमली होती. जवळपास एक ते दीड हजार नागरिक जमले होते आणि ते सर्व जण त्याच्या समाजाचे होते. सर्वाची नजर इमारतीच्या चौथ्या मजल्यावर होती. बाथरूमच्या खिडकीतून तो खाली डोकावत होता आणि इमारतीवरून खाली उडी मारण्याची धमकी देत होता. पोलिसांनी इमारतीभोवती घातलेला घेराव पाहून आता पोलिसांच्या तावडीत सापडणार, याची त्याला जाणीव झाली होती. त्यामुळे पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी त्याचा हा आटापिटा सुरू होता. ‘मैं बाहर नही आऊंगा, अगर आप लोगोंने मुझे पकडने की कोशीश की तो मैं खिडकी से कूद के जान दे दूंगा’ असे संवाद फेकत तो मोठमोठय़ाने ओरडत होता. ‘शोले’ चित्रपटाची आठवण करून देणारा हा प्रसंग होता. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून एकीकडे जमावाला शांत करण्याचे, तर दुसरीकडे त्या चोरटय़ाला बोलण्यात गुंतविण्याचे काम सुरू होते. तसेच या चोरटय़ाला कोणत्याही परिस्थिती पकडायचेच असा चंग पोलिसांनी बांधला आणि त्यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली. इमारत आणि घराबाहेरील पथके माघारी बोलविण्याचा दिखावा पोलिसांनी उभारला पण त्यापैकी काही पोलिसांना इमारतीच्या जिन्यात लपून राहण्यास सांगितले. पोलिसांची पथके माघारी परतत असल्याचे पाहून तो खूश झाला आणि त्याने घराचा दरवाजा उघडून पळ काढला. मात्र इमारतीच्या जिन्यात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्याला पकडले. त्यानंतर पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी सुरू केली. त्यामध्ये पोलिसांचा संशय खरा ठरला. तो अट्टल सोनसाखळी चोर असल्याचे निष्पन्न झाले. मोहमद सिकंदर जाफरी (२५) असे त्याचे नाव. तो मोटारसायकल चालविण्यात तरबेज असून त्याचा उपयोग त्याने सोनसाखळी चोरीसाठी सुरू केला होता.