हिवाळी पक्ष्यांच्या परतीचा प्रवास सुरू; उन्हाच्या झळा वाढू लागल्याने मायदेशी

उत्तर आणि मध्य आशियातून स्थलांतरित होऊन असंख्य पक्षी हिवाळय़ात भारतात येत असतात. यंदा पालघर जिल्हय़ातील समुद्रकिनारी, दलदल भाग, तलाव, भातशेती, डोंगराळ भाग येथे अनेक स्थलांतरित पक्षी आढळून आले. आता उन्हाळा सुरू झाल्याने या पक्ष्यांनी मायदेशी प्रयाण करण्यास सुरुवात केली आहे.

भारतात एकूण १२०० पक्ष्यांच्या प्रजाती आहेत. त्यातील २२९ प्रजाती या हिवाळ्यात उत्तर आणि मध्य आशियातून स्थलांतरित होऊन भारताला भेट देतात. तेथे होणारी बर्फवृष्टी आणि त्यामुळे उद्भवणारे अन्नाचे दुर्भिक्ष यामुळे या भागातील पक्षी हे हिवाळ्यात भारतात भेट देतात. पालघर जिल्हय़ातील समुद्रकिनारी आणि पाणथळ जागी अनेक परदेशी पक्षी आढळून आले आहेत. परंतु उन्हाच्या झळा सहन न होत असल्याने पक्ष्यांनी मायदेशी परतण्यास सुरुवात केली असल्याचे पक्षीनिरीक्षक सचिन मेन यांनी सांगितले.

पालघर जिल्हय़ातील ‘नेस्ट’ ही संस्था पालघर जिल्हय़ातील स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करते. हिवाळय़ात आलेले परदेशी पक्षी आता परतत असल्याचे या संस्थेकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील स्थालांतरित पक्षी

  • हिवाळ्यात समुद्रकिनारी, दलदल आणि तिवरांच्या परिसरात युरेशियन ऑस्टर केचर, ग्रेप्लवर, केंटिश प्लवर, गल पक्षी परतताना आढळून आले.
  • दलदल, धरण, तलाव भागात रडी शलडक, कॉमन टिल, युरेशियन विजन यांसारखी रानबदके मोठय़ा प्रमाणावर आढळून आली.
  • मोर शराटी, पेसिफिक गोल्डन फ्लावर, ब्लू थ्रोट, वटवटय़ा, धोबी पक्षी आदी पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे.
  • भातशेती, माळरान प्रदेशात आलेले मॉन्टेग्यु हेरियर, पळस मैना, लाल छातीचा मच्छीमार, डेझल्ट विटीअर हे पक्षी आणि डोंगराळ भागात युरेशियन हॉबी, ब्लॅक इयर्ड काइट, बुटेरिगल हे पक्षी  परतताना दिसत आहेत.
  • महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी नोंद करण्यात आलेल्या ‘नयनसरी बदक’ या दुर्मीळ बदकाची यंदा हिवाळ्यात पालघर तालुक्यातील कुर्झे धरण येथे आढळल्याची नोंद नेस्ट या संस्थेने केली