नालासोपारा येथे राहणाऱ्या संजीवनी जाधव (२०) या विवाहितेने अंगावर रॉकेल टाकून जाळून घेऊन आत्महत्या केली. माहेरून पन्नास हजार रुपये आणण्यासाठी तिच्या पतीने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. तुळिंज पोलिसांनी तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.
संजीवनी ही लग्नापूर्वी कुर्ला येथील गांधीनगरमध्ये राहत होती. कोल्हापूरला राहणाऱ्या अभिजीत जाधव याच्याशी २० जानेवारी २०१४ रोजी तिचा विवाह झाला होता. लग्नानंतर ते दोघे कोल्हापूर येथे राहत होते. परंतु तिचा पती तिला मारहाण करून मानसिक छळ करीत होता. त्यानंतर संजीवनी पुन्हा मुंबईला माहेरी आली होती. त्यानंतर पती तिला घ्यायला आला आणि नंतर दोघे नालासोपारा येथे भाडय़ाच्या घरात राहू लागले. दरम्यान, संजीवनी गर्भवती राहिली होती. प्रसूतीच्या खर्चासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा तिच्या पतीने लावला होता. त्यासाठी तो तिला सतत त्रास देऊन छळत होता. या त्रासाला कंटाळून संजीवनीने अंगावर रॉकेल टाकवून स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केली. तुळिंज पोलिसांनी अभिजीतवर गुन्हा दाखल केला आहे.