नातेवाइकांसमक्ष जीव गमावला; पालिका अधिकारी, कंत्राटदार, नगरसेवकाविरोधात गुन्हा
स्मार्ट सिटीचा डंका पिटत शहरातील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण करावयास निघालेल्या ठाणे पालिकेतील ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे राबोडी परिसरातील एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ठाणे कारागृहाजवळील संरक्षक भिंतीलगत असलेल्या पदपथाचा काही भाग अचानक खचल्याने जमिला अनिस खान ही महिला खड्डय़ात पडली आणि नातेवाईकांसमक्ष चिखलात रुतून तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पालिकेचे अधिकारी, कंत्राटदार, अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच स्थानिक नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, त्यांची नावे स्पष्ट झालेली नाहीत.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री ११.३० च्या सुमारास ही घटना घडली. ठाण्यातील दुसरी राबोडी येथे राहणारे सईद रहमान खान (६८) व त्यांची सून जमिला आणि तिची मुले उथळसर येथून रिक्षाने घरी जात होते. त्यांची रिक्षा ऊर्जिता हॉटेलजवळ बंद पडली. त्यामुळे ही मंडळी रिक्षातून उतरून पायी घरी निघाली. ठाणे कारागृहाजवळील संरक्षक भिंतीलगत असलेल्या पदपथावरून हे सर्व घरी परतत असताना जमिला खान यांच्या पायखालचा पदपथाचा भाग १० ते १५ फूट खोल खचला आणि त्या खड्डय़ात पडल्या. या पदपथाखाली असलेल्या नाल्यात मोठा गाळ होता. या गाळात जमिला रुतल्या आणि नातेवाईकांसमक्षच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेचे वृत्त कळताच या भागात संतप्त नागरिक मोठय़ा प्रमाणात जमा झाले. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना येण्यास उशीर झाल्याने संतापलेले काही तरुण नाल्यात उतरले आणि त्यांनी जमिलाचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर तिचा मृतदेह ठाण्याच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला.