ठाण्यात डॉक्टरने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. २१ वर्षीय पीडितेच्या तक्रारीनंतर डॉक्टरला अटक करण्यात आली असून संबंधित रुग्णालयाला टाळे ठोकण्यात आले. प्रतीक तांबे असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर डॉक्टरला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पीडित महिला सरोगेट मदर असून ती ठाण्याच्या नौपाडा परिसरातील निर्मिती रुग्णालयात आली होती. यावेळी  तांबे याने वैद्यकीय तपासणीच्या बहाण्याने महिलेवर लैंगिक अत्याचार केला. आरडाओरड केल्यानंतर तोंड दाबून अत्याचार सुरुच ठेवला, असे तक्रारीत महिलेने नमूद केले आहे. मुंबईतील ही गरीब महिला सरोगसीसाठी पात्र आहे का? याची वैद्यकीय तपासणी करताना तिच्यावर अत्याचार केल्याची तांबे याने पोलिसांसमोर कबुल केले. त्यानंतर पोलिसांनी रुग्णालय सील केले. या डॉक्टरांकडून आणखी कुठल्या महिलेवर अशाप्रकारे अत्याचार घडला आहे का? याचा तपास करत असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी सांगितले.