रेल्वे पोलिसांचे महिलांना आवाहन; डब्यात पोलीस नसेल तर हेल्पलाइनशी संपर्क साधा

महिलांच्या डब्यात जर पोलीस नसतील आणि डब्यात एकही प्रवासी नसेल तर कुणीही या डब्यातून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे. जर डब्यात पोलीस नसेल तर तात्काळ हेल्पलाइनला संपर्क केल्यास पोलीस सुरक्षा प्रदान करण्यात येईल, असे रेल्वे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले.

विरारमध्ये धावत्या लोकलमधून कोमल चव्हाण या तरुणीला बाहेर फेकण्यात आले. गेल्या काही महिन्यांपासून रेल्वे स्थानकातील महिला आणि एकंदरीतच प्रवाशांच्या सुरक्षेबाबत विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. मंगळवारी पालघर व वसई रेल्वे पोलिसांनी संयुक्त मोहीम घेऊन सर्व स्थानकातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्याही अडचणी समजावून घेण्यात आल्या. रेल्वे स्थानकाबाहेरील नशेबाज, तृतीयपंथी, टवाळक्यांना हाकलण्यात आले. सीसीटीव्हींची तपासणी करण्यात आली आहे, रेल्वे स्थानकात कुठे त्रुटी आहेत, कुठे अधिक सुरक्षा बळकट करता येईल याची चाचपणी करण्यात आली. स्कायवॉक निर्मनुष्य असतात तेथे जोडपी जातात. तेथेही गस्त घालण्यात येणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.

सराईत गुन्हेगार नाही

विरारमध्ये धावत्या ट्रेनमधून बाहेर फेकलेल्या कोमल चव्हाण या तरुणीचा हल्लेखोर सराईत गुन्हेगार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विरार स्थानकातून तिला बाहेर फेकल्यानंतर तो नालासोपारा स्थानकात उतरून आरामात चालत गेल्याचे पोलिसांनी सांगितले. कोमल चव्हाणच्या हल्लेखोराला शोधासाठी पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. पोलिसांनी रेकॉर्डवरील सर्व सराईत गुन्हेगारांची तपासणी केली आहे. त्यामुळे पोलीस या घटनेत इतर शक्यता पडताळून तपास करत आहेत. कोमलला विरार स्थानकाबाहेर फेकल्यानंतर आरोपीने नालासोपारापर्यंत प्रवास केला. नालासोपारा स्थानक आल्यानंतर तो आरामात चालत स्थानकाबाहेर पडल्याचे सीसीटीव्हीतून दिसून आले आहे. रात्रीची वेळ आणि अस्पष्ट कॅमेरे यामुळे आरोपीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे त्याच्या देहबोलीवरून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे वसई रेल्वे पोलिसांनी सांगितले.

महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या पोलिसांची सुरक्षा

महिला रेल्वे पोलिसांच्या सुरक्षेसाठी आता वसई रेल्वे पोलिसांच्या बरोबर महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पोलीसही तैनात करण्यात येणार आहे. रेल्वे पोलीस, होमगार्ड आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पोलीस मिळून महिलांच्या प्रत्येक महिलांच्या डब्यात सुरक्षा प्रदान करणार आहेत. वसई रेल्वे पोलिसांच्या अखत्यारीत मीरा रोडपासून वैतरणापर्यंतची स्थानके येतात. रात्री १० ते पहाटे ६ पर्यंत एकूण ११ गाडय़ांमध्ये सुरक्षा पोहोचवण्याची जबाबदारी वसई रेल्वे पोलिसांकडे होती. महिलांचे द्वितीय आणि प्रथम श्रेणीचे मिळून एकूण तीन डबे असतात. त्या डब्यांमध्ये रात्रीच्या वेळी सुरक्षा देण्यात येत होती. आता महाराष्ट्र सुरक्षा बलाचे ९ पोलीस रेल्वे पोलिसांना मिळाले आहेत. त्यामुळे रेल्वे पोलीस, गृहरक्षक दल आणि महाराष्ट्र सुरक्षा बलाचे पोलीस महिलांच्या डब्यात सुरक्षा पोहोचवणार असल्याची माहिती वसई रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली.