‘आपल घर स्वच्छ, तर आपल शहर स्वच्छ’ हा मंत्र जागवत डोंबिवलीतील ‘इनरव्हिल क्लब’च्या माजी अध्यक्षा अपर्णा कवी आणि त्यांच्या पाच सहकारी गेली वर्षभर घराघरात जाऊन ‘कचरामुक्त डोंबिवली’ या विषयी जनजागृती करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ‘कचरामुक्त’ अभियानाची वर्षभरात दहा हजारांहून अधिक पत्रके डोंबिवलीतील घरांत, शाळा, महाविद्यालये, व्यापारी, रिक्षा वाहनतळ, फेरीवाले, नाक्यांवर देऊन अपर्णा कवी व त्यांच्या सहकाऱ्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. या उपक्रमाबद्दल त्यांचा ‘इनरव्हिल क्लब’च्या जिल्हा विभागातर्फे ‘विशेष सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये अपर्णा कवी या इनरव्हिल क्लब डोंबिवलीच्या अध्यक्षा झाल्या. डोंबिवली शहर दिवसेंदिवस बकाल होत चालले आहे. त्यामुळे इतर उपक्रमांपेक्षा नागरिकांना कचऱ्याच्याबाबतीत शिस्त लावण्याचा प्रयत्न करू, असा निर्धार त्यांनी केला. या विचारातून कचरामुक्त डोंबिवली अभियान सुरू केले. या अभियानाची माहिती देणारी पत्रके तयार करायची आणि शहराचा एक भाग निवडून विदुला दीक्षित, शांभवी वीरकर, सरिता गुप्ता, स्वाती सिंग, बिना धूत, शोभा कामत व इतर सहकाऱ्यांच्या मदतीने सोसायटी, बंगले, रस्ते, रिक्षा वाहनतळ अशा पद्धतीने जाऊन जनजागृती करायची, असा त्यांचा रोजचाच दिनक्रम आहे. अर्पणा कवी यांच्या ९८३३७४३५३७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अनेक डोंबिवलीकर त्यांचे मार्गदर्शन घेत आहेत.

जनजागृती कशी?
’घरातील कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी याविषयी माहिती दिली जाते.
’रिक्षा चालकांना रस्त्यावर थुंकणे किती अयोग्य असून त्याचे दुष्परिणाम काय आहे, याची माहिती दिली जाते.
’शाळकरी मुलांना चॉकलेटची वेष्टने, खाऊ खाल्ल्यानंतरचा कचरा कुठे टाकावा, हे शिकविले जाते.
’व्यापाऱ्यांना दिवसभराच्या उलाढालीनंतर दुकानात जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी, याची जनजागृती केली जाते.
’ज्येष्ठ नागरिकांचा कचरा मुक्त अभियानातील सहभाग, विद्यार्थ्यांच्या कचरा मुक्तीवर चित्रकला स्पर्धा घेण्यात येतात.
’चित्रपटगृहात कचरामुक्त अभियानाची एक ‘सीडी’ दिली आहे. ती मधल्या वेळेत मधुबन, पूजा सिनेमागृहात रसिकांना दाखविली जाते.
’सावित्रीबाई नाटय़गृहातील स्वच्छतेविषयी तेथील व्यवस्थापनाला सल्ला दिला जातो.
’पालिका, पोलीस, रोटरी, रोट्रॅक्ट, लायन्स क्लब, विविध सरकारी, निमसरकारी कार्यालयांमध्ये पत्रके वाटली जातात.
’एमआयडीसीतील बंगले, सोसायटय़ांमध्ये जाऊन अपर्णा यांनी कचरामुक्त अभियानाची जागृती केली आहे.
’ओला, सुका कचरा वेगळा करून घरातही कचऱ्याचे खत तयार होते या विषयीचे मार्गदर्शन केले जाते.
गणेशोत्सव, नवरात्र काळात मंडळांना भेटून त्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले जाते.
’गणपती, दुर्गा विसर्जनाच्या वेळी पत्रके काढून कचरामुक्त अभियान, जल प्रदूषण या विषयी माहिती दिली जाते.

जनजागृतीचा परिणाम
अभियानाच्या पत्रकावर भ्रमणध्वनी असल्याने अनेक नागरिक अपर्णा कवी यांच्याशी संपर्क साधतात. रामनगरमध्ये ‘रितू’ इमारतीच्या बाजूला कचऱ्याचा ढीग साचला होता. या भागातील एका रहिवाशाने कवी यांच्याशी संपर्क केला. कवी यांनी त्या ठिकाणी जाऊन तेथील व्यापाऱ्यांना संघटित केले. तेथे कचरा न टाकण्याची सूचना केली. जमा झालेला कचरा उचलण्यासाठी वर्गणी जमा करून तो कचरा उचलण्याची सूचना केली. व्यापाऱ्यांनी ती मान्य केली.

‘इनरव्हिल क्लब’चे आता आपण अध्यक्षपदी नाही, पण संस्थेने कचरामुक्त अभियान सुरूच ठेवण्याचे सुचविले आहे. त्यामुळे आपला उपक्रम सुरू आहे. या उपक्रमामुळे घराघरात, शाळेत, रहिवासी, रिक्षा चालकांमध्ये जागृती झाल्याचे दिसते. कोठेही कचरा साचला असेल. पालिका काही करीत नसेल तर नागरिक आम्हाला महिती देतात.  -अपर्णा कवी, सदस्य, इनरव्हिल क्लब

भगवान मंडलिक, डोंबिवली