कल्याण स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांनी आता थेट पोलिसांना मारहाण करण्यापर्यंत मजल गाठली आहे.  कल्याणमध्ये रेल्वेच्या हद्दीतील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला पोलिसालाच फेरीवाल्यांनी मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघा फेरीवाल्यांना अटक केली आहे.
मध्य रेल्वेवरील महत्त्वाच स्टेशन असलेल्या कल्याण स्टेशनला सध्या फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. फेरीवाल्यामुळे स्टेशन परिसरात वाट काढताना प्रवाशांनाच तारेवरची कसरत करावी लागते. या मुजोर फेरीवाल्यांविरोधात कल्याणमधील रेल्वे सुरक्षा दलाच्या पथकाने कारवाईला सुरुवात केली आहे. आरपीएफमधील महिला पोलिस प्रतिभा साळुंखे या शुक्रवारी संध्याकाळी फेरीवाल्यांवर कारवाई करत असताना फेरीवाल्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला.. मुजोर फेरीवाल्यांनी साळुंखे यांच्याशी बराच वेळ हुज्जत घातली. तसेच त्यांना घेराव घालून कारवाईत अडथळे आणण्याचे प्रयत्नही केला.  या दरम्यान काही फेरीवाल्यांनी साळुंखे यांनाच मारहाण केली. मारहाणीचा हा सर्व प्रकार कॅमे-यातही कैद झाला आहे.

दरम्यान, महिला पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे. दुर्गा तिवारी आणि शुभम मिश्रा अशी या आरोपींची नावे आहेत.  सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याणमधील फेरीवाल्यांचा प्रश्न दिवसेगणिक बिकट होत आहे. रेल्वे प्रशासन आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे या फेरीवाल्यांचे फावले. कोणाचाही धाक उरला नसल्याने फेरीवाल्यांमधील मुजोरी वाढल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करुन त्यांना हद्दपार करावे अशी मागणी आता प्रवासी करु लागलेत.